सिंधुदुर्ग : बिबट्याची कातडी विक्री करण्याच्या उद्देशाने देवगड येथून सावंतवाडी शहरात आलेल्या पाच जणांना सापळा रचून रंगेहाथ पकडण्यात आले आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने मळगाव घाटात ही कारवाई केली असून साडेतीन लाख किमतीच्या बिबट्याच्या कातडीसह क्वॉलिस गाडी असा एकूण साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
देवगड येथून सावंतवाडीच्या दिशेने बिबट्याच्या कातड्याची तस्करी होत असल्याची माहिती स्थानिक अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता. झाराप पत्रादेवी बायपासवरून मळगाव घाट मार्गे सावंतवाडीत येत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी क्वॉलीस गाडीतील तस्करांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून बिबट्याचे सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीचे कातडे हस्तगत केले. तसेच या प्रकरणात वापरण्यात आलेली क्वॉलिस गाडी ताब्यात घेण्यात आली.
या तस्करीप्रकरणी समीर सूर्यकांत गुरव, नितीन प्रकाश सूर्यवंशी, व्यंकटेश दत्ताराम राऊळ, किरण राजाराम सावंत, दिनेश काशिराम गुरव या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचा ताबा वन विभागाकडे देण्यात आला आहे. आज शुक्रवारी त्यांना सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली.
गेल्या काही महिन्यांपासून तळकोकणात प्राण्याच्या तस्करीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या परिसरात अवैध विक्री करणाऱ्या अनेक टोळ्या कार्यरत असून त्यांची लिंक कर्नाटक आणि गोव्यापर्यंत आहे. त्यामुळे वन विभाग आणि स्थानिक पोलीस या भागातील अवैध विक्रीवर नजर ठेऊन आहेत
महत्वाच्या बातम्या :
- मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी दानवे पुढाकार घेणार असतील तर राज्य सरकारचा पूर्ण पाठिंबा; उद्धव ठाकरेंचे आश्वासन
- Mumbai Flyover Collapses : बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील MMRDA चा पूल कोसळला; 21 कामगार जखमी
- Anil Deshmukh Case : ED च्या आरोपपत्रात अनिल देशमुखांचं नावच नाही; अद्याप चौकशी झाली नसल्याचं कारण