(Source: ECI/ABP News/ABP Majha)
New Year Plans : बजेटमध्ये थर्टीफर्स्ट साजरा करायचाय? मग ही बातमी खास तुमच्यासाठी...
शहरात पार्टी करण्यासाठी किंवा मजा करण्यासाठी कोणताही पर्याय सापडत नसेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. शहरातल्या शहरात बजेटमध्ये साजरं करा नवं वर्ष...
Pune New Year Plans : नववर्षाचे (pune) स्वागत करण्यासाठी (new year) पुणेकर सज्ज झाले आहेत. कॅम्पिंगपासून ते पार्ट्यांपर्यंत, तुम्ही शहरात नवीन वर्ष साजरे करत असाल आणि तुम्हाला शहरात पार्टी करण्यासाठी किंवा मजा करण्यासाठी कोणताही पर्याय सापडत नसेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. शहरातल्या शहरात बजेटमध्ये साजरं करा नवं वर्ष...
1) कॅम्पिंगसाठी जा आकाशाचा आनंद घ्या:
खचाखच भरलेल्या पब आणि गोंगाट असलेल्या रेस्टॉरंटपासून दूर, मुळशी बॅक वॉटर, पानशेत किंवा पवना तलावाच्या शांततेत 2023 मध्ये पुन्हा टवटवीत होण्यासाठी शांत नववर्षाचा आनंद घ्या. खुल्या आकाशाखाली निसर्गरम्य तलावाजवळ निवांत वीकेंडचा आनंद आपण लुटू शकतो. अजून म्हणावी अशी थंडीही पुण्यात आलेली नाही. अनेक रिसॉर्ट्स टेन्टमध्ये राहण्याची ऑफर देत आहेत. तुमच्या बजेटमध्ये देखील आहे आणि मजा पण येईल.
2) पहाटे ट्रेकला जा
वर्षाच्या शेवटच्या दिवसात अनेकांनी ऑफिसमध्ये भरपूर काम केलं आहे. त्यात नव्या वर्षाचे अनेक संकल्पही केले असतील. सकाळी उठून व्यायाम करायला संकल्प तर दरवर्षी अनेक लोक करतात. हाच संकल्प पूर्ण करण्याची सुरुवात करण्यासाठी कोणताही लहान-मोठा ट्रेक करु शकता. काही निवडक स्थळांमध्ये शहराजवळील सिंहगड, राजगड-तोरणा, कळसूबाई आणि देवकुंड धबधबा याठिकाणांना भेट देऊ शकता.
3) मित्र मंडळींचा गृप एकत्र करा अन् धम्माल करा
ड्रेस अप करा, तुमची मित्र मंडळी एकत्र करा आणि तुमच्या पद्धतीने पार्टी करा. या नवीन वर्षाच्या पार्टीसाठी सर्वोत्तम पर्यायांमध्ये सनबर्न एनवायई, एजंट जॅकची अमानोरा न्यू इयर पार्टी, इमॅजिका न्यू इयर बॅश 2023 आणि पुण्यातील ग्रँड हयात येथे ग्लोब पार्टी यांचा समावेश आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रमंडळींबरोबर या ठिकाणांवर जाऊन पार्टी करु शकता.
4) पक्के पुणेकर असाल तर मिसळीवर ताव मारा
तुमच्या नवीन वर्षाची सुरुवात 'मिसळ', 'वडा पाव', 'बन मस्का' किंवा क्लासिक 'कांदा पोहे' या उत्तम नाश्त्याने करु शकता. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी योग्य मूड सेट करण्यासाठी मित्र आणि कुटुंबियांसोबत उत्तम नाश्ता करण्यासाठी बादशाई, बेडेकर मिसळ, दुर्वांकुर, न्यू पूना बोर्डिंग हाऊस, जॉर्ज कॅफे किंवा मारझोरिन या शहरातील आवडत्या ठिकाणांना भेट द्या.
5) मंदिरांना भेट द्या
पुण्याचा लाडका बाप्पा दगडूशेठ गणपती, सारसबाग त्यानंतर पर्वती या सारख्या मंदिरांचं दर्शन घेऊन नव्या वर्षासाठी आशिर्वाद घ्या.