Pune Janmashtami 2023 : पुण्यात यंदा रात्री 10 वाजेपर्यंत दहीहंडी उत्सव साजरा करता येणार
पुणेकरांना आता दहीहंडी उत्सव रात्री 10वाजेपर्यंतच साजरा करता येणार आहे. तसंच सर्वोच्च न्यायालय आणि राज्य सरकारच्या आदेशाचे पालन करण्यात येईल, असं शहर पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
पुणे : पुणेकरांना आता दहीहंडी उत्सव रात्री 10वाजेपर्यंतच साजरा करता येणार आहे. तसेच, सर्वोच्च न्यायालय आणि राज्य सरकारच्या आदेशाचे पालन करण्यात येईल, असं शहर पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. याआधी शहरातील काही सार्वजनिक मंडळांनी दहीहंडी उत्सवाला रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी देण्याची मागणी केली होती. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत डॉल्बीच्या वापराला बंदी आहे. तर राज्य सरकारकडून दहीहंडी उत्सवासाठी वेळ वाढवून देण्याबाबत निर्णय झालेला नाही आहे. त्यामुळे शहरात रात्री 10 वाजेपर्यंतच दहीहंडी उत्सवाला परवानगी देण्यात आली आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्त्यावर दरवर्षीप्रमाणे यंदा विविध दहीहंडी उत्सव मंडळांकडून दहीहंडी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे मजुर अड्डा चौक (बुधवार चौक) ते दत्तमंदिर चौक, बेलबाग चौक ते सेवासदन चौक, मजुर अड्डा चौक ते अप्पा बळवंत चौक, महात्मा फुले मंडई, महाराष्ट्र साहित्य परिषद, नवी पेठ या ठिकाणी होणाऱ्या दहीहंडी उत्सवासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. पुण्यात वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून काळजी घेतली जाते.
पुण्यात दहीहंडी उत्सवाचा जल्लोष
पुण्यात दहीहंडी उत्सवाचा जल्लोष प्रत्येक चौकाचौकात दिसून येतो. पुण्यातील बाजीराव रोड, मंडई, बाबूगेनू हे पुण्यातील मोठे दहीहंडी मंडळं आहेत. त्याशिवाय पुण्यातील विविध चौकात अनेक कार्यकर्त्यांकडून दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा केला जातो. लाखो लोक हा उत्सव पाहण्यासाठी घराबाहेर पडतात. मात्र यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्तदेखील तैनात करण्यात येतो. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस कायम तत्पर असतात किंवा अपघात झाल्यास लवकरात लवकर उपचार मिळावेत यासाठी संपूर्ण सुविधा देण्यात येते. दरवर्षी लाखो रुपयांची बक्षीसंदेखील देण्यात येतात.
पुण्यात यंदा तृतीयपंथीयांचं पथक
तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात (Transgender) आणण्यासाठी पुण्यात वेगवेगळ्या उपाययोजना सुरू करण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी महापालिकेची सुरक्षा 10 तृतीयपंथीयांच्या हाती सोपवली होती. पुण्यातील प्रसिद्ध ससून रुग्णालयात तृतीयपंथीय रुग्णांसाठी स्पेशल वॉर्ड सुरू केलं आणि त्यानंतर आता याच तृतीयपंथीयांना विविध सणांच्या समारंभात समाविष्ठ करुन घेत असल्याचं चित्र आहे. यंदा पुण्यात दहीहंडीसाठी खास तृतीयपंथीयांचं गोविंदा पथक स्थापन करण्यात आलं आहे. हे राज्यातील पहिलंच तृतीयपंथीयांचं गोविंदा पथक आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :