Pune Jain Boarding Land: मोठी बातमी: पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीच्या व्यवहाराला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती
Pune Jain Boarding Land: पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस प्रकरणात अति तातडीची सुनावणी मुंबईतील धर्मादाय आयुक्तालयात पार पडली.

Pune Jain Boarding Land: पुण्यातील शिवाजीनगर येथील ऐतिहासिक जैन बोर्डिंग हाऊसच्या जागा विक्रीविरोधात उभ्या राहिलेल्या लढ्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई येथे धर्मादाय आयुक्तालयात आज (सोमवार दि. 20) या प्रकरणाची तातडीची सुनावणी पार पडली. धर्मादाय आयुक्त अमोघ कलोटी यांनी या प्रकरणावर ‘स्टेटस्को’ म्हणजेच परिस्थिती 'जैसे थे' ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे जैन समाजाच्या संघर्षाला न्यायालयीन पाठबळ मिळालं असून जागेच्या विक्रीला तातडीचा ब्रेक लागला आहे.
Pune Jain Boarding Land: काय घडलं सुनावणीत?
एचएनडी जैन बोर्डिंगच्या जमीन विक्रीविरोधातील याचिकेवर आज सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. योगेश पांडे यांनी अत्यंत भक्कम, कायदेशीर आणि पुराव्यांसहित मांडणी केली. जैन समाजाचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया, अक्षय जैन आणि इतर अनेक बांधव देखील सुनावणीसाठी मुंबईत उपस्थित होते. संपूर्ण समाजाचे लक्ष लागलेल्या या सुनावणीत न्यायालयाने ‘स्टेटस्को’ आदेश दिला आहे.
Pune Jain Boarding Land: जागेचा नेमका वाद काय?
पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलची जागा शिवाजी नगर येथे आहे. जिथे दिगंबर जैन बोर्डिंग आणि शेतंबर जैन बोर्डिंग आहे. 1958 साली हिराचंद नेमचंद दोषी यांनी या वसतीगृहाची उभारणी केली होती. ही जागा काही महिन्यांपूर्वी चर्चेत आली होती. कारण विश्वस्त या जागेवर नियंत्रण ठेवून नवीन विकास करण्यास इच्छूक होते. तर समाजातील काही लोकांनी याला विरोध केला होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच ही जागा परस्पर हडप करुन तिची विक्री करण्यात आल्याचा आरोप जैन समाजाकडून केला जात आहे. पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांनी या जागा विक्रीला मंजुरी देताना सर्व नियम, कायद्यांची पायमल्ली केली. या जमीनविक्रीच्या व्यवहाराशी संबंध असलेल्या गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याशी लागेबांधे असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
Murlidhar Mohol: खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप
या प्रकरणात गोखले कन्स्ट्रक्शन या कंपनीचं नाव समोर आलं असून, याच कंपनीसोबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भागीदारी होती, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. यावरून आमदार रवींद्र धंगेकर यांनी थेट मोहोळ यांच्यावर टीका करत त्यांना राजीनामा देण्याची मागणी केली आहे. धंगेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या प्रकरणाच्या चौकशीसाठी पत्र लिहिण्याची घोषणा केली असून, समाजाच्या भावना दुखावणाऱ्या व्यवहारात केंद्रीय मंत्री सहभागी असतील, तर त्यांनी स्वतःहून पद सोडावे, अशी मागणी केली आहे.
Murlidhar Mohol: मुरलीधर मोहोळ यांचं स्पष्टीकरण
खासदार मोहोळ यांनी या सर्व आरोपांना विरोध केला असून म्हटलं की, पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्रीच्या व्यवहाराशी माझा कोणताही संबंध नाही. ज्या गोखले बिल्डर्सशी माझी भागीदारी असल्याचा आरोप होत आहे, त्यांच्या दोन्ही कंपन्यांमधून मी वर्षभरापूर्वीच बाहेर पडलो होतो. त्यामुळे जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन व्यवहाराशी माझा कोणताही संबंध नाही, असे स्पष्टीकरण भाजप खासदार मुरलीधर मोहोळ यांनी दिले.























