Petrol : पुण्यातील सरकारी पेट्रोल डेपोतून रोज लाखो रुपयांची इंधन चोरी, कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचा गुन्हे शाखेला संशय
Pune : या प्रकरणी गुन्हे शाखेने 10 जणांवर गुन्हा दाखल केला आहे, या चोरीमध्ये कंपनीच्या अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा संशय आहे.
पुणे: शहरातील लोणी काळभोर इथल्या भारत पेट्रोलियमच्या (Bharat Petrolium) डेपोमधून पेट्रोल आणि डिझेलची चोरी होत असल्याचं समोर आलं आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने टाकलेल्या छाप्यात ही इंधनचोरी उघड झाली. या प्रकरणात दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून काहींना अटक करण्यात आली असून कंपनीचे काही अधिकारी देखील यात सहभागी असल्याचा संशय आहे. पेट्रोल पंप चालकांनी याची गंभीर दाखल घेण्याची मागणी केलीय आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांना त्याबाबत पत्र लिहल आहे.
पुण्याजवळील लोणी काळभोर जवळ भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या तीन सरकारी कंपन्यांचे डेपो आहेत. इथून पेट्रोल आणि डिझेल टॅंकर्समध्ये भरून वेगवगेळ्या पेट्रोल पंपावर पाठवलं जात. मात्र इथल्या भारत पेट्रोलियमच्या डेपोमधून वाहतूक करणारे टँकर चालक इंधनाची चोरी करत असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेने भारत पेट्रोलियमच्या डेपोवर छापा असता टॅंकरमधून बादल्यांच्या सहाय्याने इंधन काढलं जात असल्याच आढळलं. त्याचबरोबर वाहतूक करणारे टॅंकर त्यांच्या इंधनाच्या टाकीत इथूनच इंधन भरून घेत असल्याचं आढळलं.
एका टँकरमधून एकावेळी एक लाख रुपयांच्या इंधनाची चोरी होत असल्याचा अंदाज आहे. भारत पेट्रोलियमच्या इथल्या डेपोतून दररोज साडेतीनशे टँकर इंधनाची वाहतूक करतात. पण ही इंधन चोरी फक्त भारत पेट्रोलियमच्या डेपोतून होत असावी असं नाही तर हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या इतर दोन कंपन्यांच्या शेजारीच असलेल्या डेपोमधून देखील ही अशी चोरी होत असल्याचा पेट्रोल पंप चालकांना संशय आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दाखल घेण्याची मागणी पेट्रोल पंप चालकांच्या संघटनांनी केंद्र सरकारला केली आहे .
पुणे पोलिसांनी या प्रकरणात दहा टँकर जप्त केले असून छाप्यावेळी इंधनचोरी करणाऱ्या सहा जणांना अटक केली आहे. मात्र ही इंधन चोरी भारत पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या सहभागाशिवाय होणं शक्य नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे. भारत पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांशी याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. मात्र त्यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांबाबत संशयाचं वातावरण आणखीनच गडद होतंय.