Daund Crime News : आत्महत्या की घातपात! भीमा नदीत पाच दिवसात चार मृतहेद; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
Pune Daund Crime : दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीत मागील सहा दिवसांपूर्वी आढळून आलेल्या चार मृतदेहांची ओळख पटलेली असून ते नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील आहेत.
Daund Crime News : दौंड (Daund) तालुक्यातून वाहत असलेल्या भीमा नदीत (Bhima River) चार मृतदेह आढळले होते. ते मृतदेह एकाच कुटुंबातील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पती-पत्नी मुलगी आणि जावई यांचे चार मृतदेह आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीत मागील सहा दिवसांपूर्वी आढळून आलेल्या चार मृतदेहांची ओळख पटलेली असून ते नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील आहेत. चार जणांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आणखी तीन लहान मुले बेपत्ता आहेत.
मोहन उत्तम पवार, संगिता मोहन पवार, राणी शाम फुलवरे, शाम फुलवरे अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. त्यांच्यासोबत चार वर्षांच्या आतील तीन लहान मुले आहेत, असं बोलले जात आहे. तीन मुले अद्याप बेपत्ता आहेत. हे कुटुंब मंगळवारी 17 जानेवारी रोजी रात्री अकरानंतर वाहनाने निघोज या गावातून निघाले होते. शिरूर - चौफुला रोडवर असलेल्या दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीत भीमा नदीच्या पात्रात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृतदेह आढळून आले होते. 18 जानेवारी रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर 20, 21 आणि 22 जानेवारी रोजी तीन मृतदेह आढळून आले होते. भीमा नदीच्या पात्रात मागील पाच दिवसात एकाच कुटुंबातील चार मृतदेह आढळून आल्याने यवत पोलीस सतर्क झाले आहेत. मात्र त्यांच्यासोबत असलेल्या तीन लहान मुलांचा अद्याप शोध लागला नाही. ही प्रथम दर्शनी आत्महत्या असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. परंतु ही आत्महत्या आहे की घातपात याचा तपास दौंड पोलीस करीत आहेत.
पाच दिवसात चार मृतदेह
21 तारखेला एका स्त्रीचा मृतदेह आढळला. तसेच 22 तारखेला पुन्हा पुरुषाचा मृतदेह आढळला. सलग पाच दिवसात एकूण चार मृतदेह आढळले. सलग चार मृतदेह सापडल्याने सर्वांनाच धक्का बसला. पोलीस प्रशासन देखील या घटनेने चक्रावले आहे. त्यामुळे ही सामूहिक आत्महत्या आहे की मोठा घातपात, याबाबतचा तपास करण्याचे आव्हान पोलीस प्रशासनापुढे निर्माण झालं आहे. पोलिसांनी भीमा नदी पात्रात कसून शोधकार्य सुरू केले होते. तसेच परिसरात देखील या मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू केलं होतं. मृत व्यक्तींसोबत त्यांची मुले असण्याचीही शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. यातील एका मृतदेहासोबत एक चावी तर महिलेच्या मृतदेहासोबत मोबाईल फोन आणि सोने खरेदीची पावती सापडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं.