(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बाईला भोंदूबाबाचा नाद भोवला! पतीच्या हत्येप्रकरणी तुरुंगवारी
पुण्यातील एका महिलेला भोंदूबाबाच्या नादाला लागल्याने तुरुंगवारी झाली आहे. पतीच्या हत्येप्रकरणी पत्नी आणि भोंदूबाबाला अटक करण्यात आली आहे.
पुणे : भोंदूबाबांच्या नादी लागलं तर काय होऊ शकतं याचं जिवंत उदाहरण पुण्यात समोर आलंय. एक महिला या भोंदूबाबाच्या प्रेमाच्या जाळ्यात फसली आणि प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीची हत्या करायलाही तिने मागे-पुढे पाहिलं नाही. आज ही महिला भोंदूबाबासह तुरुंगाची हवा खातीये. पाहुयात पुण्यात घडलेल्या या धक्कादायक घटनेचा हा रिपोर्ट.
रमेश कुंभार असे या भोंदू बाबाचे नाव असून त्याने पिंपरी चिंचवडमधील आनंद गुजर यांचा खुन केलाय. पुण्यातील कात्रज बोगद्याजवळ आनंद गुजर यांचा मृतदेह आढळला आणि या भोंदूबाबाचं पितळ उघडं झालं. अनैतिक संबंध आणि मालमत्ता प्रकरणात अडसर ठरत असल्याने त्याने हे कृत्य केलं. आनंद गुजर यांची पत्नी देखील या कटात सामील होती.
पिंपरी चिंचवडच्या एका मठात आनंद गुजर यांची हत्या झाली. हा शिवगोरक्षनाथ मठ गेल्या तेरा वर्षांपासून रमेश कुंभार चालवतो. बुवाबाजीसाठी तो या ठिकाणी प्रचलित आहे. रमेश कुंभारच्या संपर्कात आनंद गुजरच्या पत्नी सरोज गुजर इथंच आल्या. भेटी-गाठी वाढू लागल्या, गेल्या दोन महिन्यांपासून तर सरोज गुजर त्यांच्या दोन्ही मुलांसह इथंच वात्सव्यास होत्या. यातूनच त्यांचे किती घनिष्ट संबंध होते हे स्पष्ट होतं. तीन जुलैला आनंद गुजर त्यासाठीच इथं पोहचले होते. तेव्हा इथं वाद झाला, त्यांना लाकडी बॅट आणि दांडक्याने बेदम मारहाण करून त्यांचा जीव घेण्यात आला.
कात्रज बोगद्याजवळ तीन जुलैला अनोळखी मृतदेह आढळला. पुणे पोलिसांनी तपासाची चक्र हलवली आणि हत्येचं कनेक्शन या मठापर्यंत पोहचलं. आनंद गुजरच्या पत्नी सरोज गुजर आणि भोंदूबाबा रमेश कुंभारसह चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या.
पिंपरी चिंचवडच्या वाल्हेकरवाडीत शिवगोरक्षनाथ हा मठ तेरा वर्षांपासून सुरुये. छोटी दर्गा, मंदिर त्यात विविध मुर्त्यांची स्थापना, होमहवन आणि त्यात अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या वस्तू. यातून रमेश कुंभार या भोंदूने अनेकांना गंडा घातला असण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच पोलिसांनी या सर्वाचा आता पर्दाफाश करण्याची गरज आहे.