Pune Koyta Gang : कोयता गॅंगची दहशत थांबेना! सिंहगड लॉ कॉलेज परिसरातील हल्ल्यात एकजण जखमी
Pune Koyta Gang : पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणाऱ्या सिंहगड लॉ कॉलेज परिसरात दोन तरुणांनी हातात कोयते घेऊन दहशत निर्माण करण्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे.
Pune Koyta Gang : पुण्यात कोयता गॅंगची दहशत सुरुच आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ (Pune crime) पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणाऱ्या सिंहगड लॉ कॉलेज परिसरात दोन तरुणांनी हातात कोयते घेऊन दहशत निर्माण करण्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोयता (Crime) बाळगून मध्यवर्ती भागात दहशत निर्माण करण्याचे कृत्य सर्रास सुरु असल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
सिंहगड लॉ कॉलेज रोडवर काल (28 डिसेंबर) दोन तरुणांनी हातात चाकू सुरे घेऊन परिसरातील दुकानांमध्ये जाऊन अनेक लोकांना भोसकले. रस्त्यात जो दिसेल त्याला चाकू दाखवून भीती दाखवली जात असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या हल्ल्यात एक जण जखमी देखील झाला आहे. जखमी झालेल्या तरुणाला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी या दोघांना पाठलाग करुन पकडले, मात्र यातील एकाने पळ काढला. एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तो अल्पवयीन असल्याचे समजते दुसऱ्या आरोपीचे नाव करण दळवी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोयता गॅंगचा धुमाकूळ
दोन दिवसांपूर्वी गॅंगने पुणे जिल्ह्यातील वेळू ग्रामपंचायत हद्दीतील श्रीराम पेट्रोल पंपावर दरोडा टाकला होता. चोरांनी कोयत्याने मारहाण करुन 22 हजार रुपयांची रोख रक्कम लुटली होती. या सगळ्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले होते. शुक्रवारी (23 डिसेंबर) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. शुक्रवारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पाच अज्ञात व्यक्ती हातात दोन ते अडीच फूट लांबीचे धारदार कोयते घेऊन दोन काळ्या रंगाच्या मोटरसायकलवरुन आले होते. त्यांनी सिक्युरिटी गार्डच्या हाताला पकडून कार्यालयात आणून रोख रकमेची मागणी केली होती. त्यांनी शिवीगाळ करत तीन कामगारांना आणि सुरक्षारक्षकाला कोयत्याने मारहाण केली होती. पेट्रोल पंपाच्या मालकाने या प्रकाराची पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार भोर पोलीस ठाण्यात अज्ञात पाच आरोपींविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
कोयता गॅंगची दहशत कधी थांबणार?
पुण्यात मागील काही दिवसांपासून कोयता गॅंगच्या दहशतीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सुरुवातीला हडपसर परिसरात कोयता गॅंगची दहशत होती. मात्र मागील काही दिवसात या गॅंगने शहरात आणि आजूबाजूच्या गावांमध्येही धुमाकूळ घातला आहे. त्याचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत.