(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Crime News : धक्कादायक! जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांचा जीवघेण्या हल्ल्यात मृत्यू
पुण्याच्या तळेगावमध्ये किशोर आवारे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. नगरपरिषद कार्यालासमोरच ही धक्कादायक घटना घडलेली आहे.
Pune Crime News : पुण्याच्या तळेगावमध्ये किशोर आवारे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे नगरपरिषद कार्यालासमोरच ही धक्कादायक घटना घडलेली आहे. कार्यालयातून बाहेर येताच, दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी आवारे यांच्यावर हल्ला केला. गोळीबार ही झाल्याचं बोललं जातं आहे. आवारे हे जनसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष आहेत. आवारे यांच्यावर नेमका कोणी आणि का हल्ला केला, हे अद्याप समजू शकलेलं नाही.
किशोर आवारे यांनी मार्च महिन्यात सोमटणे टोल नाका बंद करण्यासाठी आमरण उपोषण केलं होतं. त्या दरम्यानच मावळवासीयांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन करत, टोल नाक्यावर मोर्चा धाडला होता. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री स्वतः या आंदोलनस्थळी आले होते. त्यानंतर हा टोल नाका बंद करण्याच्या दृष्टीने पावलं उचलण्यास सुरुवात झाली होती. मात्र दरम्यान किशोर आवारे यांचा निर्घृण खून करण्यात आला. आवारे आज नगरपरिषद कार्यालयात गेले होते. त्यावेळी हल्लेखोर कार्यालयाबाहेर दबा धरून बसले होते. ते बाहेर येताच हल्लेखोरांनी त्यांच्या दिशेने गोळीबार करत कोयत्याने वार केले. आवारे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता. आवारे यांच्यावर नेमका कोणी आणि का हल्ला केला, हे अद्याप समजू शकलेलं नाही. पिंपरी चिंचवड पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. गेल्या महिण्यात शिरगावच्या सरपंचाची भररस्त्यावर कोयत्याने वार करून हत्या झाली होती. लोकप्रतिनिधींचा असा जीव जात असल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?
शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवीण गोपाळे यांची शनिवारी (1 एप्रिल) प्रतिशिर्डी साई बाबांच्या मंदिरासमोर कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी शिरगाव ग्रामपंचायतची निवडणूक पार पडली होती. त्यात प्रवीण गोपाळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आले होते. प्रवीण गोपाळे यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपींना शिरगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशाल उर्फ किरण सुनील गायकवाड (वय 25 वर्षे), संदीप उर्फ अण्णा छगन गोपाळे (वय 31 वर्षे) आणि ऋतिक शिवाजी गोपाळे (वय 22 वर्षे) अशी मारेकऱ्यांची नावे आहेत. यापैकी विशाल गायकवाड हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे समोर आलं आहे. दरम्यान या हत्येचे मुख्य कारण अद्याप समोर आलेलं नाही. परंतु जमिनीच्या प्लॉटिंगवरुन ही हत्या झाल्याचं बोललं जातं होतं.