Pune Crime : पुण्यात 19 वर्षीय तरुणाची हत्या; मित्रांकडून कोयत्याने वार, चार आरोपी अटकेत
पुण्यातील (pune) तळेगावात 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणाची हत्या झाली आहे. प्रणव मांडेकर असं मृत तरुणाचे नाव आहे. काल रात्री ही धक्कादायक घटना घडली आहे.

Pcmc News : पुण्यातील (pune) तळेगावात 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणाची हत्या (Pune crime) झाली आहे. प्रणव मांडेकर असं मृत तरुणाचे नाव आहे. काल रात्री ही धक्कादायक घटना घडली आहे. हा तरुण इंद्रायणी महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. प्रणवच्या हत्येमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी रात्रीच आठ जणांना ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादाचे पडसाद काल उमटले. वाढदिवसाच्या पार्टीसाठी जातो असं सांगून प्रणव घरातून बाहेर पडला होता. हत्येपूर्वी प्रणव मित्रांसमवेत एका कट्ट्यावर बसले होते. तेव्हा वीस जणांची टोळी त्यांच्या दिशेने आली. काहींच्या हातात कोयता असल्याचे पाहून प्रणव आणि त्याचे काही मित्र जीव वाचवण्यासाठी धावत होते. मात्र या टोळीने त्यांचा पाठलाग करून हल्ला केला. यात प्रणवचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य एक तरुण जखमी असल्याची माहिती आहे. याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी रात्रीतच आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. यात 4 अल्पवयीन मुलांचा आणि इंद्रायणी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा ही समावेश आहे. चार जणांना पोलिसांनी अटक केलं आहे.
मित्रांसोबत झाली होती वादावादी
दोन दिवसांपूर्वी प्रणव आणि त्याच्या मित्रासोबत फोनवर वादावादी झाली होती. वाढदिवसासाठी म्हणून प्रणव बाहेर पडला होता. घरी यायला उशीर झाला. त्यामुळे त्याच्या आईने त्याला फोन केला तेव्हा आईचं आणि प्रणवचं बोलणं झालं होतं. तो घरी येत आहे, असं प्रणवने सांगितलं होतं. काही वेळाने पुन्हा त्यांच्या आईने फोन केला असता आईचा फोन तळेगाव पोलिसांनी उचलला आणि त्याची हत्या झाल्याचं सांगितलं. त्यावेळी आईला धक्का बसला. पोलीस ठाण्यात गेल्यावर मित्रांसोबत वादावादी झाल्याचं पोलिसांनी प्रणवच्या आईला सांगितलं. प्रवणच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुबीयांवर दु:खाचा डोंगर पसरला आहे.
पिंपरीत हत्यांचं सत्र कधी संपणार?
पुण्याच्या बावधन परिसरात पूर्ववैमनस्यातून एका व्यक्तीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. पीतबसा कमलचंद जानी असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव होतं. याप्रकरणी प्रदीप बलभीम राजोळे, आकाश कांबळे, आकाश पवार यांच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. रविवारच्या रात्री आठच्या सुमारास पीतबसा यांच्यावर कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. त्यांच्या डोक्यात, हातावर वार करण्यात आलेत. पीतबसा कमलचंद जानी यांचा पूर्ववैमनस्यातून खून करण्यात आला होता. पुण्यातील बावधन परिसरात या हत्येमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.























