Pune Car Accident: अपघात झाला तेव्हा मुलगाच गाडी चालवत होता, पोलीस चौकशीत ड्रायव्हर गंगाराम पुजारीचा महत्त्वाचा जबाब
Pune News: पुण्यातील कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारने दोघांना चिरडले होते. यावेळी गाडी चालवणारा मुलगा पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा आहे.
पुणे: पुण्यातील कल्याणीनगर परिसरात आमच्या पोर्शे कारने दोघांना चिरडले तेव्हा मी नव्हे तर विशाल अग्रवाल यांचा मुलगाच गाडी चालवत होता, असा महत्त्वाचा जबाब ड्रायव्हरने दिला आहे. पोलिसांकडून अग्रवाल यांच्या चालकाची चौकशी करण्यात आली. यावेळी त्याला अपघात (Pune Car Accident) नेमका कसा झाला, याबाबत प्रश्न विचारण्यात आले. अग्रवाल यांच्या चालकाचे नाव गंगाराम पुजारी, असे आहे.
तेव्हा अग्रवाल यांच्या चालकाने सांगितले की, अपघात घडला तेव्हा पोर्शे कारचं स्टेअरिंग अल्पवयीन तरुणाच्या हातात होते. मी त्याच्या शेजारी बसलो होतो, अशी माहिती ड्रायव्हर गंगाराम पुजारी याने पोलीस अधिकाऱ्यांना दिली. आपला मुलगा पोर्शे कार चालवत आहे, ही गोष्ट विशाल अग्रवाल यांना माहिती होती. चालकाच्या या जबानीमुळे आता विशाल अग्रवाल यांचा मुलगा आणखीनच अडचणीत येण्याची शक्यता आहे.
पुणे अपघाताबाबत शरद पवारांचं भाष्य
पुण्यातील कार अपघातात आरोपी असलेल्या मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांचे शरद पवार यांच्यासोबतचे संबंध सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. याविषयी शरद पवारांना विचारले असता त्यांनी म्हटले की, अग्रवाल यांच्या वकिलांचा माझ्याबरोबर फोटो आहे. म्हणजे माझा त्या प्रकरणाशी संबंध आहे असे कसे म्हणता येईल? तो एक अपघात आहे. त्याला इतके राजकीय महत्व आहे, असे मला वाटत नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
बिल्डरच्या पाकिटावर काम करणारा काय कारवाई करणार? रवींद्र धंगेकरांचा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावर निशाणा
पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन अपघात प्रकरणाचा तपास योग्यरितीने सुरु असल्याचे सांगितले. आम्ही याप्रकरणात स्ट्राँग केस तयार करु, असा दावा त्यांनी केला. मात्र, काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी अमितेश कुमार यांच्यावर सडकून टीका केली. कल्याणीनगर अपघातानंतर तपासात अक्षम्य चुका होऊन देखील पुणे शहराचे पोलीस कमिश्नर अमितेश कुमार यांना अजूनही कोणी दोषी आहेत असे वाटत नाही. अर्थात जो स्वतःच बिल्डरच्या पाकिटावर काम करतोय तो कसा कुणावर कारवाई करणार...?, अशी बोचरी टीका रवींद्र धंगेकर यांनी केली.
आणखी वाचा