Pune bypoll election : भाजपने ऐनवेळी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांची कसब्याची सभा का रद्द केली?
पुण्यात पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यात रोड शो, नेत्यांच्या सभा घेतल्या जात आहे. मात्र कसबा मतदारसंघातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आजची सभा रद्द करण्यात आली आहे.
Pune bypoll election : पुण्यात पोटनिवडणुकीची (Pune Bypoll Election) रणधुमाळी सुरु आहे. यात रोड शो, नेत्यांच्या सभा घेतल्या जात आहे. मात्र कसबा मतदारसंघातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांची आजची सभा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे महlत्त्वाच्या कसबा विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याची या निवडणुकीत एकही सभा होणार नाही हे स्पष्ट झालं आहे.
कसबा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी आज डेक्कनच्या नदीपात्रात संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र ही सभा ऐनवेळी भाजपकडून रद्द करण्यात आली आहे. त्या ऐवजी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा रोड शो होणार आहे. जाहीर सभा घेण्यापेक्षा रोड शोच्या माध्यमातून जास्त लोकांपर्यंत पोहचता येईल. त्यामुळे सभा रद्द केल्याचं माजी महापौर मुरलीधर मोहोळांनी सांगितलं आहे. मात्र प्रचार जोरात सुरु असताना ऐनवेळी सभा रद्द केल्याने चर्चेला उधाण आलं आहे.
एकीकडे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघात भाजप उमेदवार हेमंंत रासने यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. या मतदार संघाच्या प्रचारात देशाचे गृहमंत्री अमित शाहांनी देखील लक्ष घातलं होतं. त्यांनी दोन दिवस पुणे दौरा केला होता. त्यानंतर मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कसब्यात बैठका घेतल्या आहेत. रात्री 2 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसबा मतदारसंघात तातडीची बैठक घेतल्याची चर्चा आहे. त्यांच्यासोबतच 40 स्टार प्रचारक निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. भाजप नेते गिरीश महाजन मागील 10 दिवसांपासून पुण्यात पोटनिवडणुकीच्या तयारीसाठी तळ ठोकून आहेत. सोबतच 100 हून अधिक नगरसेवकही या प्रचारात उतरले आहे. एवढं असूनही या मतदारसंघासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याची सभा रद्द करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
चिंचवडमध्ये दोन सभा
पुण्यातील सभा रद्द केली, मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दोन सभा चिंचवडमध्ये होणार आहे. चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्यासाठी या प्रचारसभा आयोजित करण्यात आल्या आहेत. मागील काही दिवसांपासून भाजपचे अनेक महत्वाचे नेते अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी चिंचवडमध्ये रोड शो किंवा कोपरा सभा घेत आहे. पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभा आणि रोड शो झाले आहेत. आजही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या चिंचवडमध्ये दोन सभा आहेत.