Pune Airport : पुण्यातील लोहगाव विमानतळ देखभालीच्या कामासाठी 14 दिवसांसाठी बंद
हवाई दलाकडून सप्टेंबर 2020 मध्ये विमानतळाच्या धावपट्टीच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. या कामातील महत्त्वाचा टप्पा 16 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे.
पुणे : येत्या 16 ऑक्टोबर पासून पुण्यातील लोहगाव विमानतळावरील उड्डाणे पुढील 15 दिवस बंद राहणार आहेत. विमानतळाच्या धावपट्टीच्या कामासाठी उड्डाणे बंद राहणार आहेत.
हवाई दलाकडून सप्टेंबर 2020 मध्ये विमानतळाच्या धावपट्टीच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. या कामातील महत्त्वाचा टप्पा 16 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. त्यामुळे पुढील 29 ऑक्टोबर पर्यंत विमानतळ पूर्णपणे बंद राहणार आहे. त्याचा परिणाम प्रवाशांवर होण्याची शक्यता आहे . विमान प्रवासासाठी पुण्यातील लोकांना मुंबई एअरपोर्टच्या उपयोग करावा लागू शकतो.
This is to inform all passengers that as per information received from Indian Air Force (IAF), due to runway resurfacing works, all flights from #PuneAirport will not operate for 14 days from 16 October 2021 to 29 October 2021.@AAI_Official @aairedwr @Pib_MoCA @DGCAIndia
— Pune Airport (@aaipunairport) October 5, 2021
पुणे एअरपोर्टला स्वतःची जागा नाही. भारतीय वायुदलाच्या लोहगाव येथील हवाई तळाच्या जागेमध्येच पुणे एअरपोर्ट उभे आहे. हवाई तळाचा एक भाग वायुदलाकडून वापरला जातो तर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडे असलेल्या दुसऱ्या भागात प्रवासी विमानांची ये जा होत असते.
गेली अनेक वर्ष पुणे एअरपोर्ट नवीन जागेत सुरु करण्याची चर्चा सुरु आहे. परंतु त्यासाठी लागणाऱ्या शकडो एकर जमिनीच्या अधिग्रहणात अनेक अडचणी येत असल्यानं नवीन एअरपोर्ट उभे राहू शकले नाही . मात्र आता त्याचा परिणाम विमान प्रवासावर होणार आहे. पुण्याच्या शेजारी विमानतळ उभारण्यासाठी आधी चाकणची निवड करण्यात आली होती . परंतु तो प्रकल्प बारगळला. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवडजवळ आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ उभारण्याची घोषणा करण्यात आली. परंतु त्याठिकाणी देखील नागरिकांनी जमिनी देण्यास तीव्र विरोध केल्यानं एअरपोर्टसाठी आवश्यक असलेली जमीन अजूनही अधिग्रहित होऊ शकलेली नाही .
1939 साली दुसरं महायुद्ध सुरु झाल्यानंतर इंग्रजानी पुण्याजवळील लोहगांव इथं लढाऊ विमानांसाठी हवाई पट्टी तयार केली होती. मुंबईला शत्रूच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी त्यावेळच्या रॉयल एअरफोर्सकडून लोहगावला एअरस्ट्रीप तयार करण्यात आली होती . स्वातंत्र्यानंतर भारतीय वायुदलाने या ठिकाणी लढाऊ विमानांसाठी हवाईतळ उभारला. मिग , सुखोई यासारख्या विमानाचं प्रशिक्षण देण्यासाठी हवाईदलाकडून लोहगाव हवाई तळाचा उपयोग केला जातो. वायुदलाला अनेक वर्षांपासून या तळावर दुरुस्ती करायची आहे पण प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या नागरी विमानाचं काय करायचं हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न आहे. मात्र आता वायुदलाला हवाईपट्टीच काम करणं गरजेचं बनल्यानं विमानतळावरील उड्डाणे पुढील 15 दिवस बंद राहणार आहेत.