Pune news : केल्याने होत आहे रे! कोरोनात नोकरी गेली, पठ्ठ्यानं 30 गुंठ्यांवरील अंजिराच्या शेतीतून कमावले 10 लाख
सिंगापूर या गावचे प्रगतशील शेतकरी अभिजित गोपाळ लवांडे यांनी 30 गुंठ्यांवरील अंजिराच्या शेतीतून 14 टन विक्रमी उत्पादन घेवून 10 लाख रुपयांचा नफा मिळवला आहे.
Pune news : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका हा अंजीर, सीताफळ लागवडीसाठी अग्रेसर आहे. या तालुक्यातील सिंगापूर या गावचे प्रगतशील शेतकरी अभिजित गोपाळ लवांडे यांनी 30 गुंठ्यांवरील अंजिराच्या शेतीतून 14 टन विक्रमी उत्पादन घेवून 10 लाख रुपयांचा नफा मिळवला आहे. त्यांना कृषी विभागाकडून शेततळ्याचा लाभ तसेच कृषिविषयक प्रशिक्षण मिळाले असून त्याचा त्यांना मोठा फायदा झाला आहे.
अभिजित यांची कोरोना महामारीच्या काळात नोकरी गेली. त्यानंतर त्यांनी पूर्णपणे शेतीकडे लक्ष वळवले. त्यांची वडिलोपार्जित 9 एकर शेती आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यांनी शेती बारमाही बागायती केली. त्यासाठी कृषी विभागातून शेततळ्यासाठी 3 लाख 30 हजार रुपयांचे अनुदान मिळाले.
त्यांनी शेतीत अंजीर 4 एकर, सीताफळ 3 एकर व जांभूळ पाऊण एकर अशी फळझाड लागवड केली. यामध्ये वडील व काकांचे खूप मोलाचे मार्गदर्शन मिळाले. ठिबक सिंचनासाठी अनुदान मिळावे यासाठी त्यांनी कृषि विभागात प्रस्ताव सादर केला आहे. कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या माध्यमातून कृषी विस्तार योजनांच्या प्रशिक्षण शिबिरातून शेतीमध्ये अनेक सुधारणा घडून आल्या.
अंजिर फळबाग लागवड
अभिजित यांनी 4 एकरामध्ये पुना पुरंदर या वाणाच्या 600 अंजीर झाडाची लागवड केली. खट्टा आणि मिठा अशा दोन्ही बहारात उत्पादन घेतले जाते. खट्टा बहारमध्ये जून महिन्यात छाटणी करुन साधारण साडेचार महिन्यानंतर फळ तोडणीस सुरुवात होते. प्रती झाडापासून 100 ते 120 किलो तर एकरी उत्पादन 13 ते 14 टन भेटते. या बहारात प्रती किलोचा दर 80 ते 100 रुपये येतो. मिठा बहारमध्ये ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात छाटणी व त्यानंतर साडेचार महिन्यानंतर फळ तोडणीस सुरुवात होते. या बहाराच्या फळांस प्रती किलो 85 रुपयांपर्यंत दर मिळतो.
अंजीर फळाची बाजारपेठेच्या मागणी प्रमाणे पॅकिंग करून प्रतवारीनुसार मालाची विक्री सासवड, पुणे, मुंबई, कोल्हापूर, हैद्राबाद, गुजरात व दिल्ली येथे केली जाते. मागील वर्षी जर्मनी देशातून अंजिराला मागणी आल्याने त्यांनी प्रायोगिक स्वरुपात वर 100 किलो मालाची निर्यात केली.
महाराष्ट्रासह हैद्राबाद, गुजरात राजस्थान आदी ठिकाणचे शेतकरी लवांडे यांची अंजीर बाग पाहवयास येतात व त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतात. त्यांच्या अंजीर बागेत 7 ते 8 लोकांना नियमित रोजगार भेटला असून ही देखील एक जमेची बाजू आहे. श्री. लवांडे यांनी अंजिराचे नवीन सुधारित वाणही तयार केले आहेत.
सीताफळ आणि जांभूळ
तीन एकर शेतीत त्यांनी सीताफळाच्या फुले पुरंदर वाणाची लागवड केली असून गतवर्षी 4 लाख 68 हजार रुपयांचा नफा मिळवला. सीताफळाला 120 ते 160 रुपयांचा दर त्यांना मिळाला. अभिजीत यांनी पालघर कृषि विद्यापीठांतून जांभळाचे कोकण बार्डोली हे वाण आणून पाऊण एकरात त्याची लागवड केली आहे. पुढील वर्षी जांभूळ विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.
शेतीपूरक व्यवसाय
लवांडे हे रोपवाटिकेचा (कानिफनाथ नर्सरी) शेतीपूरक व्यवसाय करत आहेत. 2021 मध्ये अंजिराची 2 हजार व सीताफळाची 1 हजार रोपे अशी एकूण 3 हजार रोपे तयार करून विक्री केली. सन 2022 मध्ये अंजिराची 12 हजार रोपे व सीताफळाची 6हजार, रत्नदीप पेरू 3 हजार अशी एकूण 21 हजार रोपांची विक्री केली तर 2023 साठी रोपांची आगाऊ नोंदणी करण्यात येत आहे.
सेंद्रिय शेतीचा फायदा
अभिजित लवांडे यांनी सेंद्रीय शेतीवर भर दिला आहे. त्यामुळे फळांची गुणवत्ता वाढली आहे. त्यांनी जीवामृत, घन जीवामृत, दशपर्णी अर्क, निमास्त्र अशा प्रकारचे जीवामृत त्यांनी अंजीर झाडास वापरले. तसेच गांडूळ खत, शेणखत, कंपोस्ट खत, भूशक्ती (कोंबडीखत) आणि हिरवळीच्या खतांचा वापर केला.