सुप्रिया सुळे, अजित पवार की रोहित पवार... पवारांमधला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार नेमका कोण? हे तुम्हीच घरच्या घरी ठरवा: प्रविण दरेकर
Pravin Darekar On Supriya Sule: पवारांमधला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार नेमका कोण? हे तुम्हीच घरच्या घरी ठरवा, असा टोला प्रविण दरेकरांनी पवार कुटुंबीयांना लगावलाय. पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
Pravin Darekar On Supriya Sule: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या मुख्यमंत्री होण्यासाठी पुजाअर्चा, अभिषेक करत आहेत. आपले लाडके उपमुख्यमंत्रीदेखील मुख्यमंत्री होण्याच्या स्पर्धेत आहेत. रोहित पवार देखील मोठ-मोठ्या लोकांवर वक्तव्य करुन पुढे येत आहेत. पवारांमधला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार नेमका कोण? हे तुम्हीच घरच्या घरी ठरवा, असा टोला भाजप नेते प्रविण दरेकरांनी पवार कुटुंबीयांना लगावला आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
आमदार रोहित पवारांनी गोपीनाथ मुंडे यांच्यावर खोचक वक्तव्य केलं होतं. त्यावर बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, रोहित पवारांनी आपल्या उंची प्रमाणे बोलावं. नुकतिच त्यांची राजकारणात सुरुवात झाली आहे. गोपीनाथ मुंडे आता हयात नाही. त्यांच्या संदर्भात वक्तव्य करुन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये. अजित पवार नेहमी सांगतात वाद-विवाद करु नका त्यापेक्षा लोकांचे कामं करा त्यामुळे तुम्ही देखील तसं काही करु नये. तुम्ही तुमच्या घरातली काळजी घ्या, असा खोचक सल्लाही त्यांनी रोहित पवारांनी दिला.
संजय राऊतांनी नीट बोलावं
आमदारांना घोड़ेबाजारात उभं करणे हा आमदारांचा अपमान आहे. आमदार काही बाजारातली विकाऊ वस्तु नाही. एक आमदार किमान तीन लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतात. संजय राऊतांना आमदार विकाऊ वस्तू वाटत असेल तर तेसुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहे.आमदारांचा स्वाभिमान दुखावला तर संजय पवार निवडून यायचे आणि संजय राऊत यांना धोका मिळेल. त्यामुळे आता तोंड सांभांळून वागले तर त्यांच्या फायद्याचं राहिल, असंही ते म्हणाले.
जो चुकतो त्याला ईडीची भीती
ईडीची भीती सर्वसामान्य आमदारांना वाटत नाही. ज्यांचं कृत्य ईडी चौकशी होण्यासारखं असेल तर त्यांना भीती वाटणं साहजिक आहे. ईडी-ईडी म्हणताना तुम्ही धुतल्या तांदळाचे आहात का? क्राईम ब्रांच,अॅन्टी करप्शन यांना तुम्ही कुलूप लावलंय का? ईडी सारख्या कोणत्याही यंत्रणांना आम्ही दोष देत नाही. आमदार शहराचा प्रगल्भ नागरीक असतो. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे?, हे आमदारांना योग्य पद्धतीने कळतं. तुमचा आत्मविश्वास हरवला असेल दुसऱ्याला दोष देण्यात अर्थ नाही, असा टोला त्यांनी संजय राऊतांना लगावला.