(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sushma Andhare : गृहमंत्रीपद झेपत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा; सुषमा अंधारेंची जहरी टीका
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुचकामी ठरत आहेत. त्यांना हे झेपत नसेल तर त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, असा हल्लाबोल शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
Sushma Andhare : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुचकामी ठरत आहेत. त्यांना हे झेपत नसेल तर त्यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, असा हल्लाबोल शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केला आहे. सहा जिल्ह्याचं पालकमंत्री पद, गृहमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपद यामुळे तुमच्यावर कामाचा ताण वाढत आहे. शिंदे गटाचे नेते म्हणाले त्याप्रमाणे तुमच्यावर सलाईन लावायची वेळ येऊ नये, असंही त्या देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हणाल्या.
आम्हा सगळ्यासाठी तुम्ही भाऊ म्हणून महत्वाचे आहात मात्र जर काम झेपत नसेल तर योग्य माणसाला या पदावर नियुक्त करा. त्यामुळे महिलांच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं जाईल आणि त्यांचे प्रश्न सुटतील, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. गुलाबराव पाटलांवर आणि संभाजी पाटील यांच्याविरोधात महिला आयोगाने नोटीस काढल्या नाहीत, हे आम्हाला महिला आयोगाला लक्षात आणून द्यायचं आहे. प्रेमपत्रासारख्या नोटीसा पाठवून काहीही होणार नाही. त्याच्या तक्रारी दाखल झाल्या पाहिजे. संबंधित माणसावर कारवाई होणं किंवा आयोगाने त्याचा फॉलोअप घेणं गरजेचं असतं, अशी टिप्पणीही त्यांनी महिला आयोगावर केली आहे.
भारतीय जनता पक्षाचे नेते महिलांचा सन्मान करत नाहीत. संभाजी भिडेंनी केलेल्या वक्तव्याबद्दल देवेंद्र फडणवीस का व्यक्त झाले नाहीत. अमृता फडणवीस यांना देवेंद्र फडणवीस टिकलीवरुन बोलतील का? असा प्रश्न विचारला आहे. गुलाबराव पाटील हे सरंजामी वृत्तीचे आहेत. त्यांचे वाक्य देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्रालयाला आक्षेपार्ह वाटत नाही. पोलीस देखील गुलाबराव पाटलांचे हस्तक आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.
"महिला आयोगाने सिलेक्टिव्ह वागू नये."
अब्दुल सत्तार यांनी यांना सत्तेचा माज आला आहे. अब्दुल सत्तार आणि गुलाबराव पाटील यांनी माफी मागावी. अब्दुल सत्तार यांना तुम्ही आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात नोटीस बजावता तर गुलाबराव पाटील यांना नोटीस का बजावत नाही, असा सवाल त्यांनी महिला आयोगाला विचारला आहे. महिला आयोगाने सिलेक्टिव्ह वागू नये. सत्तार आणि गुलाबराव पाटील यांच्यावर कारवाई होत नसेल तर हे देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन होतं आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. गुलाबराव पाटील यांंच्याविरोधात तक्रार देण्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना दोन वेळा फोन केला मात्र त्यांनी फोन उचलला नाही, असा दावा देखील त्यांनी केला आहे.
"महिलांना एकेरी भाषा वापरल्याने डॉन होत नाही"
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांची दोन्ही मुलं सातत्याने शिवसेनेतील महिलांवर बोलतात. नारायण राणेंना वाटत असेल की एकेरी भाषा वापरल्याने ते डॉन होतील तर असं नाही. कोणी छपरी बोलून डॉन होऊ शकत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली आहे.