Pune PMPML : बस चालकांची अरेरावी चालणार नाही! पुणेकरांनो 'या' नंबरवर तक्रार करा अन् मिळवा...
चालक आणि वाहकांच्या चुकीच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक योजना सुरू केली आहे. ड्रायव्हर किंवा कंडक्टरची पुराव्यानिशी तक्रार करणाऱ्या नागरिकांना आता 100 रुपये बक्षीस म्हणून देणार आहे.
Pune PMPML : पुणे PMPML च्या अनेक तक्रारी आतापर्यंत समोर आल्या आहेत. त्यातच चालकांचा किंवा कंडक्टरच्या तक्रारीदेखील अनेक नागरिक करत असतात. याच सगळ्या पुणे महानगर परिवहन महामंडळ प्रायव्हेट लिमिटेड (PMPML) ने चालक आणि वाहकांच्या चुकीच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक योजना सुरू केली आहे. अशा ड्रायव्हर किंवा कंडक्टरची पुराव्यानिशी तक्रार करणाऱ्या नागरिकांना ट्रान्सपोर्ट युटिलिटी आता 100 रुपये बक्षीस म्हणून देणार आहे.
वाहन चालवताना फोनवर बोलणे किंवा इअरफोन वापरणे हे (प्रवाशांच्या) सुरक्षेच्या दृष्टीने चांगले नाही. त्याचप्रमाणे, रुट बोर्ड नसणे किंवा बसवर चुकीचा मार्ग बोर्ड नसणे, झेब्रा क्रॉसिंगवर बस थांबवणे यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. अशा कोणत्याही प्रकारासाठी ड्रायव्हर किंवा कंडक्टरला 1,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असल्याचं PMPMLने सांगितलं आहे.
प्रवासी किंवा नागरिकांकडून अशी कोणतीही तक्रार आल्यावर, तक्रारींची पडताळणी झाल्यानंतर त्यांना 100 रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल. त्याच वेळी, चालक किंवा कंडक्टरच्या पगारातून 1,000 रुपयांचा दंड वसूल केला जाईल, असं स्पष्ट आदेश चालकांना देण्यात आले आहे.
तक्रार कशी कराल?
सध्या सोशल मीडियाचं युग आहे. त्यामुळे सगळीकडे व्हिडीओ आणि फोन क्लिप्स व्हायरल होत असतात. याचाच आधार घेत पुणे PMPML ने तक्रारीसाठी सोशल मीडियाचा आणि व्हिडीओचा वापर करु शकता असं सांगितलं आहे. तक्रारीस पात्र अशा ड्रायव्हर किंवा कंडक्टर विरुद्ध तक्रार करण्यासाठी नागरिक फोटो किंवा व्हिडीओ क्लिक करू शकतात आणि तक्रारी@ppml.org वर किंवा 9881495589 वर व्हॉट्सअॅपवर बस क्रमांक, मार्ग, स्थळ, घटनेची तारीख आणि वेळ पाठवू शकतात आणि अशा तक्रारी पुराव्यासह जवळच्या डेपोतही सादर करता येतील.
तक्रारीमध्ये फोटो / व्हिडिओ, बस क्रमांक, मार्ग क्रमांक, ठिकाण, तारीख आणि वेळ या सर्व तपशीलांसह तक्रार नोंदवा. तक्रार योग्य असल्यास नागरिकांना 100 रुपये बक्षीस स्वरूपात देण्यात येईल.या नविन उपक्रमात सहभागी व्हावे आणि पुणेकर नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अनेकांच्या सोयीची आणि परवडणारी अशी या PMPML बसची ओळख आहे. त्यामुळे रोज हजारो प्रवासी PMPMLने प्रवास करत असतात. मात्र बसचालकांचा अरेरावीपणा वाढत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे आता या उपाययोजनेमुळे चालकांचा अरेरावीपणा कमी होईल अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा-