Pune Metro : पुणे सुसाट! मेट्रोचं तिकिट किती, जाणून घ्या एका क्लिकवर
Pune Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (मंगळवार, 1 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर येणार आहेत.
PM modi pune visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (मंगळवार, 1 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी त्यांच्या हस्ते बारा किलोमीटरच्या मेट्रो मार्गाचे उद्घाटन होणार आहे.. यामध्ये अंडरग्राउंड मेट्रोचा देखील समावेश आहे. उद्घाटन झाल्यानंतर पुणेकरांसाठी या मेट्रोची सेवा खुली केली जाणार आहे. गरवारे कॉलेज ते रुबी हॉल, आणि सिविल कोर्ट ते फुगेवाडी या दोन मार्गांचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तिकिटाचे दर काय असतील, याबाबत पाहूयात
पुणे मेट्रोचे तिकीट दर -
■ वनाझ ते रुबी हॉल : ₹ 25
■ पिंपरी-चिंचवड ते सिव्हिल कोर्ट : ₹ 30
■ वनाझ ते पिंपरी-चिंचवड : ₹ 35
■ रुबी हॉल ते पिंपरी-चिंचवड : ₹ 30
■ वनाझ ते डेक्कन जिमखाना/संभाजी उद्यान / पीएमसी: ₹ 20
■ वनाझ ते शिवाजीनगर/सिव्हिल कोर्ट/रेल्वे स्टेशन: ₹ 25
■ रुबी हॉल ते शिवाजीनगर: ₹ 15
■ रुबी हॉल ते डेक्कन जिमखाना : ₹ 20
■ पिंपरी-चिंचवड ते पीएमसी/पुणे रेल्वे स्टेशन : ₹ 30
दोन टप्प्यांचे लोकार्पण -
पुणे मेट्रो टप्पा 1 च्या कार्य पूर्ण झालेल्या दोन मार्गिकांच्या सेवेचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. हे विभाग फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय स्थानक तसेच गरवारे महाविद्यालय स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानकापर्यंत आहेत. 2016 मध्ये पंतप्रधानांच्याच हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी झाली होती. मेट्रो रेल्वेचे हे नवीन विभाग पुणे शहरातील शिवाजी नगर, दिवाणी न्यायालय, पुणे महानगरपालिका कार्यालय, पुणे आरटीओ आणि पुणे रेल्वे स्थानक यांसारखी महत्त्वाची ठिकाणे जोडतील. देशभरातील नागरिकांना आधुनिक आणि पर्यावरणस्नेही गतिमान शहरी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाला साकार करण्याच्या दिशेने हे लोकार्पण एक महत्त्वाचे पाऊल आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून प्रेरणा घेत मेट्रो रेल्वे मार्गावरील काही मेट्रो स्थानकांची रचना करण्यात आली आहे. छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानक आणि डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकांची रचना ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी परिधान केलेल्या पगडी सारखी म्हणजेच ज्याला "मावळा पगडी" देखील म्हटले जाते, या सारखी आहे. शिवाजी नगर भूमिगत मेट्रो स्थानकाची एक विशिष्ट रचना आहे जी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांची आठवण करून देते. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दिवाणी न्यायालय मेट्रो स्थानक. हे देशातील सर्वात खोलवर असलेल्या मेट्रो स्थानकांपैकी पैकी एक आहे, ज्याचा सर्वात खोल बिंदू 33.1 मीटर आहे. सूर्यप्रकाश थेट फलाटावर पडेल अशा पद्धतीने या स्थानकाचे छत बनवण्यात आले आहे.
वाहतूकीत बदल -
पुणे शहरातील विविध विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम १ ऑगस्ट रोजी शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आयोजित केला असल्याने त्याअनुषंगाने आवश्यक ते वाहतूक बदल करण्यात येणार असल्याचे पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे. एक ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता ते दुपारी ३ वाजेपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात आवश्यकतेप्रमाणे पुणे विद्यापीठ चौक, सिमला ऑफिस चौक, संचेती चौक, स. गो. बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक, सेवासदन चौक, अलका चौक, टिळक रोड, जेधे चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड, संगमवाडी रोड, सादलबाबा चौक, गोल्फ क्लब चौक, विमानतळ रोड आदी ठिकाणांवरील वाहतूकीत बदल करण्यात येतील.