एक्स्प्लोर
Advertisement
पुणे शहरात सर्व रस्त्यांवर 'पे अँड पार्क', महापालिकेत निर्णय
कमी गर्दीची ठिकाणे, मध्यम गर्दीची ठिकाणे आणि जास्त गर्दीची ठिकाणे अशा तीन प्रकारांमध्ये शहरातील रस्त्यांचं वर्गीकरण करण्यात येणार आहे.
पुणे : पुणे शहरात सर्व रस्त्यांवर 'पे अँड पार्क' योजना लागू करण्याचा निर्णय महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये घेण्यात आला. इतर सर्व पक्षांचा विरोध असतानाही भाजपने बहुमताच्या जोरावर ही योजना मंजूर केली.
या योजनेनुसार पुणे शहरात दिवसा आणि रात्रीही कुठल्याही रस्त्यावर गाडी पार्क करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. या योजनेसाठी त्या-त्या भागातील वाहनांच्या वर्दळीनुसार पार्किंगचे दर ठरवले जाणार आहेत.
कमी गर्दीची ठिकाणे, मध्यम गर्दीची ठिकाणे आणि जास्त गर्दीची ठिकाणे अशा तीन प्रकारांमध्ये शहरातील रस्त्यांचं वर्गीकरण करण्यात येणार आहे. या वर्गीकरणानुसार सकाळी आठ ते रात्री दहा या वेळेत दुचाकीसाठी प्रतितास दोन ते चार रुपये आकारले जाणार आहेत. तर कार आणि इतर खाजगी चारचाकी वाहनांसाठी दहा ते वीस रुपये मोजावे लागणार आहेत.
ऑटोरिक्षांसाठी सहा ते बारा रुपये मोजावे लागणार आहेत, तर मोठ्या खाजगी बसेससाठी तीस ते साठ रुपये मोजावे लागतील. रात्री दहा ते सकाळी आठ या वेळेतही चारचाकी वाहनं रस्त्यावर लावण्यास अडीच रुपयांपासून दहा रुपयांपर्यंतचे शुल्क वाहन मालकांना भरावं लागणार आहे.
रस्त्यावर रात्री गाडी पार्क करण्यासाठी एका वर्षाची रक्कम आगाऊ घेऊन परवाना देण्याची सोयही या योजनेत करण्यात आली आहे. स्थायी समितीने मंजूर केलेली ही योजना महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे.
या योजनेसाठी कुठल्या रस्त्यांवर किती पार्किंग शुल्क आकारायचं, हे अद्याप निश्चित झालेलं नाही. काही वर्षांपूर्वी महापालिकेने अशी 'पे अँड पार्क' योजना राबवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पुणेकरांच्या तीव्र विरोधामुळे ती योजना काही दिवसांमध्ये गुंडाळावी लागली होती.
या नव्या योजनेनुसार मुख्य रस्त्यांपासून अगदी झोपडपट्टीमध्येही गाडी उभी केली की पैसे मोजावे लागणार असल्यामुळे ही योजना देखील वादग्रस्त ठरण्याची चिन्हं आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement