राष्ट्रवादी नगरसेवकाकडून पिंपरी महापालिका विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात पूजा; कर्मकांडावर अंनिसचा आक्षेप
महापालिकेच्या इमारतीतच हे कर्मकांड केल्याने पुरोगामी महाराष्ट्रात नेमकं काय सुरु आहे, असा प्रश्न अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून उपस्थित केला जातोय
पिंपरी- चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदाची जवाबदारी मिळताच राष्ट्रवादीचे नगरसेवक राजू मिसाळांनी कक्षातच पूजा घातली. विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर बसण्यापूर्वी मिसाळांनी घातलेल्या या पूजेत कोरोनाच्या नियमांचे हे उल्लंघन झालंय. महापालिकेच्या इमारतीतच हे कर्मकांड केल्याने पुरोगामी महाराष्ट्रात नेमकं काय सुरुये, असा प्रश्न अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून उपस्थित केला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अशा बाबींना कधीच थारा दिलेला नाही. त्यामुळं ते मिसाळांवर काही कारवाई करतायेत हे पाहणं महत्वाचं राहील. पण दुसरीकडे मी पूजा नाहीतर गणपती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्याचं मिसाळांचं म्हणणं आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या साडे तीन वर्षांपासून विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे. पण या दरम्यान दिवंगत नगरसेवक दत्ता साने वगळता एक ही विरोधी पक्षनेता पत्रकाविना (प्रेसनोट) आवाज उठवू शकले नाहीत. त्यामुळं खांदेपालट करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी इच्छुकांची नावं पाठवली होती. या नऊ इच्छुकांमध्ये राजू मिसाळांचे नाव होते. पार्थ पवारांनी मावळ लोकसभेची निवडणूक लढली तेव्हा मिसाळांनी कंबर कसली होती. म्हणून पुत्र पार्थनी वडिलांकडे हट्ट धरला आणि मिसाळांची अखेर वर्णी लागली. त्यानंतर मुंबईला मंत्रालयात जाऊन मिसाळांनी अजित पवारांना सदिच्छा भेट घेतली. मग आज ते विरोधी पक्षाच्या खुर्चीचा ताबा घेण्यासाठी एक वाजता महापालिकेत दाखल झाले. सोबत मानलेले गुरु अभ्यंकर सर आणि दोन भडजी ही घेऊन ते आले होते. काहीवेळाने महापालिकेतील विरोधी पक्षनेत्यांच्या कक्षातच पूजा सुरु झाली. भडजींनी मंत्र म्हणायला सुरुवात केली. तशी कक्षाकडे अनेकांच्या नजरा गेल्या. तेंव्हाच मिसाळांनी मानलेल्या गुरूंचे पाय धरले, त्यांनी ही आशीर्वाद दिले आणि स्वतःच्या हाताने मिसाळांना खुर्चीवर बसवले. मग दोन भडजींकडून मंत्राची सांगता करताना खुर्चीवर बसलेल्या मिसाळांच्या शरीरावर अक्षदांप्रमाणेच काहीतरी टाकले. या दरम्यान विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात मिसाळांनी आणलेल्या गणपती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही झाली. एकवेळ गणपती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणं ही श्रद्धा मानली तरी इतर तंत्र-मंत्र करून शासकीय खुर्चीवर विराजमान होणं हे श्रद्धेत नव्हे तर कर्मकांडात मोडतं. त्यामुळं विरोधी पक्षनेता म्हणून महापालिकेतील मिसाळांची पहिलीच एन्ट्री वादात अडकली आहे. तसेच या पूजेच्या दरम्यान मिसाळ, दोन भडजींसह अनेकांनी मास्क घातलेले नव्हते तसेच सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडालेला होता.
शासकीय कार्यालयात कोणतेही कर्मकांड करू नये असे निर्देश असताना ही मिसाळांनी अशी पूजा घातली. त्यामुळेच अंधश्रधा निर्मूलन समितीने यावर आक्षेप घेतलेत. तसेच पिंपरी चिंचवडमध्ये थैमान घातलेल्या कोरोनामुळं परिस्थिती भयावह आहे. अशात या पूजे दरम्यान मिसाळ आणि दोन भडजींसह अनेकांनी मास्कच घातलेले नव्हते तर सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याचे ही पहायला मिळालं. याकडे ही अंनिसचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनी बोट दाखवलं.
पिंपरी चिंचवडची भूमी ही मोरया गणपतींच्या नावाने ओळखली जाते. त्यामुळं कोणत्याही कार्याची सुरुवात मी गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने करतो, त्याच अनुषंगाने मी केवळ विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात गणपती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. मी श्रद्धाळू असून अंधश्रद्धाळू नाही असं स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते पदाच्या खुर्चीवर विराजमान झालेल्या राजू मिसाळांनी दिलं.
पुरोगामी महाराष्ट्रातील कोणत्याही शासकीय कार्यलयात असे कर्मकांड होणं ही बाब लाजिरवाणी आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार आणि अजित पवारांनी अशा बाबींना कधीच थारा दिलेला नाही. त्यातच शरद पवारांनी विनामास्क तसेच सपशेल डिस्टंसिंगचा फज्जा उडवणाऱ्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत चिंता व्यक्त केली तर अजित पवारांनी थेट कडक कारवाईचे आदेश दिले. हे पाहता राजू मिसाळांवर पवार काही कारवाई करतात का हे पाहणं उचित राहील.