Pune Assembly Elections: '...तर पुणे-पिंपरीत भाजपचा प्रचार न करण्याचा ठराव राष्ट्रवादी करू शकते! अजित पवारांच्या आमदाराचा इशारा
Pune Assembly Elections: आगामी विधानसभा निवडणुकीची राज्यातील पक्षांनी मोठी तयारी केली असतानाच आता पुण्यातील मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार न करण्याचा ठराव भाजपने केल्याची चर्चा सुरू होत्या.
Pune Assembly Elections: आगामी विधानसभा निवडणुकीची (Assembly Elections) राज्यातील पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. अशातच पुण्यातील मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार न करण्याचा ठराव भाजपने (BJP) केल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर आता पुणे आणि पिंपरी चिंचवड (Pune News) शहरात कमळाचा प्रचार न करण्याचा ठराव राष्ट्रवादी (NCP) ही करू शकते, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांकडून देण्यात आला आहे.
मावळ विधानसभेत (Maval Constituncy) घडाळ्याचा प्रचार न करण्याचा ठराव भाजपने केला आहे, त्याचप्रमाणे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कमळाचा प्रचार न करण्याचा ठराव राष्ट्रवादी ही करू शकते, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी भाजपला दिला आहे. मावळमध्ये महायुतीने सुनील शेळकेंना (Sunil Shelke) उमेदवारी दिली तर घडाळ्याचा प्रचार करायचा नाही, असा ठराव भाजपचे नेते बाळा भेगडेंच्या (Bala Bhegde) उपस्थितीत झाला आहे.
त्याचबरोबर सांगली लोकसभेच्या (Sangli Lok Sabha) निकालाचा दाखला देत भेगडेंनी बंडखोरीचे ही संकेत दिले आहेत. त्यानंतर प्रदेश भाजपच्या (BJP) वरिष्ठांनी मला सूचना दिल्यानं मी वेट ऍण्ड वॉचच्या भूमिकेत आहे. भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता बंडखोरी करूच शकत नाही, तिसरा उमेदवार उभा राहिला तर त्याला पाठिंबा देण्यासाठी हे कारस्थान सुरु आहे, असं म्हणत शेळकेंनी भेगडेंच्या बंडामागे षडयंत्र असल्याचं सूचित केलं आहे. पण भाजपने मावळमध्ये जसा ठराव केला, तसा ठराव पुण्यासह पिंपरी चिंचवड (Pune News) शहरात अजित पवारांची राष्ट्रवादी ही करू शकते, असा इशारा ही शेळकेंनी भाजपला दिला आहे. अजित पवार गटाच्या वाट्याला असणाऱ्या मावळ विधानसभेवरून महायुतीत सध्या हे रणकंदन सुरू झालं आहे.
काय म्हणालेत सुनील शेळके?
याबाबत बोलताना आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) म्हणाले, भाजपच्या कार्यकर्त्यांना काय करायचं ते करू द्या, जनता आमच्यासोबत खंबीरपणे आमच्यासोबत ऊभी राहिलं, भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता बंडखोरी करूच शकत नाही, तिसरा उमेदवार उभा राहिला तर त्याला पाठिंबा देण्यासाठी हे कारस्थान सुरु आहे, असं मला वरिष्ठांकडून सांगण्यात आलं आहे, आपण महायुती म्हणून सोबत आहोत, आपण सोबत लढणार आहोत, जर भाजपने असा कोणता ठराव केला तर आम्ही आमच्या पारंपारिक पिंपरी-चिंचवड मतदारसंघामध्ये तसा ठराव करू शकतो, पण आम्हाला त्यात जायचं नाही, आम्हाला भाजपच्या वरिष्ठांनी सांगितलं आहे, असंही माध्यमांशी बोलताना अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंनी (Sunil Shelke) म्हटलं आहे.