आजपासून नाट्यगृह सुरु झाली, पुण्यातील भरत नाट्यमंदिरातला पहिला दिवस कसा होता?
8 महिन्यांच्या अवकाशानंतर परत रंगभूमीवर वावरण्याची संधी त्यांना मिळाली. सगळ्यांनी उत्स्फुर्तपणे नांदी सादर करण्याचं ठरवलं.
पुणे : पुण्यातल्या भरत नाट्यमंदिराचे कर्मचारी असलेले राम काकांचा चेहरा आनंदाने फुलून गेला होता. आज त्यांची लगबग सुरु होती. मागच्या 8 महिन्यांपेक्षा आजची सकाळ त्यांचासाठी वेगळी होती. लाॅकडाऊनच्या काळात सगळं बंद असताना, नाट्यगृह परत कधी सुरु होईल याची कल्पनाही नसताना रामकाका रोज नेटाने भरत नाट्य मंदिर स्वच्छ करायचे. त्यांची इच्छा एकच होती. नाटकांच्या प्रयोगासाठी आपलं नाट्यगृह नेहमीच तयार असलं पाहीजे.
काल शेवटी नाट्यगृह सुरु करण्याची परवानगी शासनाकडून देण्यात आली आणि भरत नाट्यमंदिरात लगबग सुरु झाली. आज सकाळी राम काकांनी आनंदात सगळी साफसफाई केली. भरत नाट्यमंदिराशी जोडलेल्या कलाकारांमध्येही चैतन्य पसरलं. आज रंगभूमी दिन आणि 8 महिन्यांच्या अवकाशानंतर परत रंगभूमीवर वावरण्याची संधी त्यांना मिळाली. सगळ्यांनी उत्स्फुर्तपणे नांदी सादर करण्याचं ठरवलं.
विंगेत लगबग सुरु झाली. तंत्रज्ञांची धावपळ दिसू लागली. रंगभूमीवरचे लाईट, माईक सुरु झाले. बंद पडद्याआड कलाकरांची तालिम सुरु झाली. वाद्यांचे सुर जुळायला लागले. इतर वेळी रसिकांनी तुडूंब भरलेलं सभागृह पाहून कलाकारांना उर्मी येते. पण आज मात्र रंगमंचावर उभं राहून रिकामं सभागृह पाहणही कलाकरांसाठी प्रेरणादायी होतं. शेवटी सगळी तयारी झाली. रंगभूमीवरच्या नटराजाच्या प्रतिमेचं आणि पडद्याचंही पुजन करण्यात आलं. आणि यानंतर अखेर तिसरी घंटा वाजली आणि पडदा दुर झाला.
चारुदत्त आफळे, रविंद्र खरे यांसारख्या ज्येष्ठ्य कलाकारांच्या साथीनं विविध कालखंडात नाट्यसृष्टीमध्ये गाजलेल्या 5 नाटकांची 5 नांदी सादर करण्यात आल्या. समोर प्रेक्षक जरी नसले तरीही परत रंगभुमीवर आल्याचा आनंद सगळ्या कलाकरांनी बोलून दाखवला. आजपासून 50 टक्के क्षमतेनं नाट्यगृह सुरु झाली. नव्या परिस्थितीशी, नव्या नियमांची अंमलबजावणी करत नाट्यगृह सुरु करण्यासाठी अजून काही दिवसांचा कालावधी द्यावा लागेल. त्यानंतर नाटकांचे प्रयोग करता येतील असं व्यवस्थापकांनी सांगतिलं. पण हे सगळं होत असताना नाट्यसृष्टीतल्या प्रत्येक घटकाने मायबाप प्रेक्षकांनाच साकडं घातलं. तुमचं प्रेम भरभरून लाभू द्या हीच अपेक्षा व्यक्त केली.