Vanraj Andekar murder: दोघांनी चौकात पाणीपुरी खात ठेवली पाळत; कार्यकर्ते नसल्याचा फायदा घेतला अन् साथीदारांना बोलवून वनराज आंदेकरांचा केला गेम
Vanraj Andekar murder: आरोपी विवेक कदम आणि दीपक तोरमकर यांनी नाना पेठ परिसराची पाहणी केली होती. दोघांनी वनराज आंदेकरांवर पाळत ठेवली होती, अशी माहिती तपासात समोर आली आहे.
पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar murder) यांची गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. आंदेकरांनी हत्या ही पुर्वनियोजित कट असल्याची माहिती आहे , या प्रकरणातील मुख्यसूत्रधार, या प्रकरणात दोषी असणारे इतर आरोपी यांनी पोलिसांनी आधीच अटक केली आहे. मात्र, या प्रकरणात हळूहळू नवे नवे खुलासे समोर येताना दिसत आहेत. या घटनेआधी आरोपी विवेक कदम आणि दीपक तोरमकर यांनी नाना पेठ परिसराची पाहणी केली होती. दोघांनी वनराज आंदेकरांवर पाळत ठेवली होती, अशी माहिती तपासात समोर आली आहे.
वनराज आंदेकरांच्या (Vanraj Andekar murder) हत्या प्रकरणात विवेक कदम आणि दीपक तोरमकर यांना अटक करण्यात आली असून, आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.
वनराज आंदेकरांच्या (Vanraj Andekar murder) हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाडच्या विरुद्ध यापूर्वी मोक्का कारवाई करण्यात आली होती. सोमनाथ गायकवाडचा साथीदार असलेला निखिल आखाडे याचा आंदेकर टोळीने आधी खून केला होता. निखिल आखाडेच्या खुनाचा बदला घेण्यासाठी गायकवाडने जमवाजमव केली. याच काळत वनराज आंदेकरांचे आणि त्यांची बहीण संजीवनी कोमकर, प्रकाश कोमकर, गणेश कोमकर यांच्याशी वाद झाले होते. कौटुंबिक वादातून कोमकरनी सोमनाथ गायकवाड याच्याशी संपर्क साधला. गायकवाड, कोमकर, प्रसाद बेल्हेकर, अनिकेत दूधभाते यांनी आंदेकर यांचा खून करण्याचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे.
सोमनाथ गायकवाड मोक्का कारवाईनंतर जामीनीवर कारागृहातून बाहेर आला. त्यानंतर त्याने वनराज आंदेकरांना संपवण्याची योजना आखली. पाळत ठेवणारे आरोपी विवेक कदम आणि दीपक तोरमकर आधीपासून गायकवाडसाठी काम करत होते. आंदेकर यांची हत्या करण्यापूर्वी आरोपींनी नियोजन केले.
रविवारी (१ सप्टेंबर)वनराज आंदेकर (Vanraj Andekar murder) आणि त्यांचा चुलत भाऊ शिवम हे डोके तालीम परिसरातील उदयकांत आंदेकर चौकात गप्पा मारत होते. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर अचानक ६ - ७ दुचाकीवरून आलेल्या काहींनी पिस्तुलातून गोळीबार केला, त्याचबरोबर कोयत्याने वार केले. त्यांची हत्या करण्यापूर्वी आरोपी तोरमकर आणि कदम यांनी नाना पेठ परिसराची पाहणी केली. दोघांनी आंदेकरांवर पाळत ठेवली होती.
वनराज आंदेकर (Vanraj Andekar murder) कार्यकर्त्यांबरोबर असल्याची माहिती आरोपींना होती. आरोपी तोरमकर आणि कदम यांनी चौकात एका ठिकाणी पाणीपुरी विक्रेत्याकडे पाणीपुरी खाल्ली. पाळत ठेवून असताना आंदेकर आणि त्यांचा भाऊ गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर कोणीही कार्यकर्ते नव्हते. याचा फायदा घेत तोरमकर आणि कदम यांनी संधी साधली. सेव्हन लव्हज चौकात थांबलेल्या साथीदारांना माहिती दिली. त्यानंतर काही वेळात तिथे आलेल्या आरोपींनी आंदेकर यांच्यावर आरोपींनी हल्ला केला, गोळ्या झाडल्या आणि कोयत्याने वार केले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.