Pune Crime : गजा मारणे गँगची कार्यकर्त्याला मारहाण, मोहोळांचा पोलिसांना आत्मपरीक्षणाचा सल्ला, म्हणाले, '...नाहीतर आमच्या पद्धतीने काम करावं लागेल'
Murlidhar Mohol on Pune Crime : कोथरूड भागात दुचाकीस्वार अभियंता देवेंद्र जोग या तरुणाला मारहाण झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली, त्यावरून मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया देताना संपात व्यक्त केला आहे.

पुणे : पुणे शहरातील कोथरूड परिसरामध्ये बुधवारी (ता -19) शिवजयंती दिवशी दुचाकीस्वार अभियंता देवेंद्र जोग या तरुणाला कुख्यात गुंड गज्या मारणेच्या गुंडांनी मारहाण केल्याची घटना घडली. शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीतून दुचाकी काढण्याचा प्रयत्न करत असताना झालेल्या वादातून तरुणाला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर एक जण फरार आहे, फरार असलेला गुंड गज्या मारणेचा भाचा असल्याचा माहिती आहे. घटनेमध्ये मारहाण करण्यात आलेला तरुण देवेंद्र जोग भाजपचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे. यामुळे शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. याबाबत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना पोलिसांनाच इशारा दिला आहे.
पुणे पोलिसांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे
‘पुण्यात सोशल मीडियावर रील्स, फोटो व्हायरल करून दहशत निर्माण केली जात आहे. पुणे पोलिस डोळे बंद करून बसले आहेत का? तरुण पिढीनं यातून काय घ्यायचं? माझ्या पुण्याचे नाव खराब व्हायला नको. लोकप्रतिनिधी म्हणून किती वेळा सांगायचं? पोलिस आयुक्त आणि सर्व पोलिस अधिकाऱ्यांना सांगणं आहे, की हे सर्व थांबलं पाहिजे, नाहीतर आमच्या पद्धतीने काम करावे लागेल,’ अशा शब्दांत मुरलीधर मोहोळ यांनी पुणे पोलिसांना शुक्रवारी सूचना केल्या. त्याचबरोबर पुणे पोलिसांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला देखील दिला आहे.
मारहाण प्रकरणात काय म्हणाले मोहोळ?
'चौकात जागा न मिळाल्यामुळे विचारणा केल्याच्या कारणाने देवेंद्र जोग या व्यक्तीला मारहाण झाली. तो माझ्या कार्यालयात काम करत नाही. तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्याला बेदम मारहाण झाली. हे समजल्यानंतर पोलिसांशी बोललो. शेवटी देवेंद्र असो किंवा कोणताही पुणेकर, माझ्या शहरात असे चालू देणार नाही. चूक करणारा कोणीही असला, तरी त्याच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई झाली पाहिजे. यामध्ये सहभागी असणाऱ्यांना वाचवायला कोणी येत असेल, तर त्यांना पोलिसांनी सोडू नये. या प्रकरणी कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. असा प्रकार कोणत्याही पुणेकरांच्या बाबतीत घडू नये, याची खबरदारी पोलिसांनी घ्यावी', असं आवाहन देखील मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
कोथरूड परिसरात गाडीचा धक्का लागल्याने जाब विचारल्यामुळे एका तरुणाला चार जणांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.19 फेब्रुवारी रोजी कोथरूड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मिरवणूक निघाली होती, त्यावेळी मिरवणुकीच्या दरम्यान चार जणांनी बाईकवरून जाणाऱ्या देवेंद्र जोग यांना कट मारला. देवेंद्र जोग यांच्याशी त्या चार जणांची वादविवाद झाला आणि त्यामुळे ते चौघे मिळून देवेंद्र जोग यांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी चौघांविरुद्ध गंभीर कलम 307 (खून करण्याचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कोथरूड पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे, तर चौथा आरोपी बाबू पवार फरार आहे. बाबू पवार हा कुख्यात गुंड गजानन मारणेचा भाचा असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणात आरोपी म्हणून अमोल विनायक तापकीर, ओम तीर्थराम धर्म जिज्ञासू, किरण कोंडीबा पडवळ, आणि बाबू पवार यांचे नावे समोर आले आहेत. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मारहाण झालेला तरुण केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात सोशल मीडिया हॅन्डल करतो, अशी चर्चा होती. त्यावर बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की, मारहाण झालेला तरुण माझ्या कार्यालयात काम करत नसून, तो भाजपचा कार्यकर्ता आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी सांगितले. मात्र, कार्यकर्ता म्हणून नव्हे तर पुण्यातील प्रत्येक तरुण किंवा नागरिकावर पोलिसांची कडक भूमिका पाहिजे. माझ्या पुणे शहराचे नाव अशा पद्धतीने खराब होत असेल तर ते चालून देणार नाही. शहरातील हे सगळे थांबले पाहिजे, अन्यथा आमच्या पद्धतीने आम्ही काम करू, असेही मोहोळ यांनी ठणकावून सांगितले आहे.





















