Mumbai Pune Homes : होऊ दे खर्च! देशात गेल्या तीन महिन्यात मुंबई , पुण्यात सर्वाधिक घरांची विक्री
गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही देशात गृहखरेदीचा जोर (Pune News) कायम असून यावर्षीच्या पहिल्या तीन महिन्यांत पुणे आणि मुंबई सर्वांधिक घर विक्री झाली आहे.
पुणे : गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही देशात गृहखरेदीचा जोर (Pune News) कायम असून यावर्षीच्या पहिल्या तीन महिन्यांत देशातील प्रमुख 8 शहरांत मिळून एकूण 1,20, 640 घरांची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे या गृहविक्रीच्या माध्यमातून तब्बल 1,10,880 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत गृहविक्रीमध्ये 41 टक्क्याची वाढ झाली असल्याचा खुलासा प्रॉपटायगरडॉटकॉमच्या रियल इनसाइट रेसिडेंशीयल – जानेवारी–मार्च 2024’ अहवालातून झाला आहे. गेल्यावर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये देशातील 8 प्रमुख शहरांत 85,840 घरांची विक्री झाली होती.
देशात पहिल्या तीन महिन्यांत झालेल्या घरांच्या विक्रीमध्ये सर्वाधिक विक्री मुंबई आणि पुणे येथे झाली असून या शहरांतील गृहविक्रीचा आकडा 65,700 वर पोहोचला आहे. यापैकी मुंबईतील घरांची विक्री सर्वाधिक असून पहिल्या 3 महिन्यांत मुंबईत 41, 590 घरांची विक्री झाली आहे. दुस-या क्रमांकावर पुणे शहर असून पुण्यात एकूण 23,110 घरांची विक्री झाली आहे. गृहविक्रीमध्ये यापाठोपाठ हैदराबाद (14,290), अहमदाबाद (12,920), बंगळुरू (10,380), दिल्ली-एनसीआर (10,060), चेन्नई (4,430) आणि कोलकाता (3,860) या शहरांचा क्रमांक लागतो.
प्रॉपटायगर डॉटकॉमचे व्यवसाय प्रमुख आणि आरईए इंडियाचे ग्रुप सीएफओ विकास वधावन म्हणाले, "आकारमान आणि मूल्याच्या बाबतीत निवासी मालमत्ता विक्रीतील वाढ ही एकंदर अर्थव्यवस्थेसाठी शुभ म्हटली पाहिजे, कारण सिमेंट आणि स्टील सहित 200 पेक्षा जास्त साहाय्यक उद्योग हे रियल इस्टेट क्षेत्रावर अवलंबून आहेत. भारतातील हाऊसिंग मार्केटची घोडदौड जबरदस्त सुरू असून 8 प्रमुख शहरांत गृह विक्री झपाट्याने वाढत आहे. आपल्या मालकीचे घर घेण्याची प्रबळ इच्छा, मजबूत विकास, स्थिर तारण दर ही यामागील मुख्य परीबळे आहेत. जसजसा गुंतवणूकदारांचा विश्वास हळूहळू पुनर्जीवित होत आहे आणि त्याला अनिवासी भारतीयांच्या मजबूत मागणीची जोड मिळत आहे, घरांच्या मागणीचा आलेख, किंमतीतील काही अनपेक्षित चढ-उतार वगळता, दमदार वृद्धीसाठी तयार झालेला दिसत आहे.”
प्रॉपटायगर डॉटकॉम आणि हाऊसिंग डॉटकॉमची संशोधन प्रमुख श्रीमती अंकिता सूद म्हणाल्या, “गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत मालमत्ता विक्रीच्या एकंदर व्यवहार मूल्यात 68% इतकी असामान्य वाढ झाली आहे. उल्लेखनीय गोष्ट ही आहे की, मुंबई, हैदराबाद, दिल्ली एनसीआर आणि पुणे यांचा एकत्रित वाटा 1.11 लक्ष कोटी रुपयांच्या एकंदर व्यवहार मूल्यात 76% इतका आहे. या वृद्धीवरून केवळ वाढती मागणी लक्षात येत नाही, तर प्रमुख व्यावसायिक जिल्ह्यांत मालमत्तेच्या किंमतीतील 15-20 टक्क्यांची लक्षणीय वाढ देखील दिसून येते. येत्या दोन तिमाहींमध्ये सुद्धा वाढीचा हा आलेख आर्थिक वृद्धी आणि मजबूत मागणीचा रेटा मिळून आणखी वर वर जाईल अशी अपेक्षा आहे.”
गेल्यावर्षीच्या तुलनेत 2-24 च्या पहिल्या तीन महिन्यांत गृहविक्री मूल्यात सर्वाधिक वाढ दिल्ली एनसीआर 12,120 कोटी (149 टक्के) मध्ये झाली असून यानंतर हैदराबाद 23, 580 कोटी (143 टक्के), अहमदाबाद 9,090 कोटी (130 टक्के), कोलकता 2,000 कोटी (59 टक्के), बंगळुरू 11, 310 कोटी (52 टक्के), पुणे 15,159 कोटी (32 टक्के), मुंबई-एमएमआर 34,340 कोटी (31 टक्के), आणि चेन्नई 3,290 कोटी (22 टक्के) या शहरांचा क्रमांक लागतो
क्षेत्रफळाच्या बाबतीत घरांची विक्री 99 दशलक्ष चौरसफुटांपासून 63% वाढून 162 दशलक्ष चौरस फुटांवर पोहोचली आहे. यात दिल्ली एनसीआर (184 टक्के)सह आघाडीवर असून यानंतर हैदराबाद (128 टक्के), अहमदाबाद (108 टक्के), कोलकता (49 टक्के), बंगळुरू (39 टक्के), मुंबई-एमएमआर (26 टक्के), पुणे (21 टक्के), आणि चेन्नई (16 टक्के) या शहरांचा क्रमांक लागतो.
या अहवालात म्हटले आहे की, “एकंदर व्यवहाराचे मूल्य’ किंवा ‘विक्री मूल्य’ 2024 च्या पहिल्या तिमाहीदरम्यान एका शहरात विकल्या गेलेल्या मालमत्तेच्या एकंदर मूल्याशी संबंधित आहे. विकलेल्या एकंदर घरांच्या संख्येला वेटेड अॅव्हरेज प्राइसने गुणून व त्यात मालमत्तांच्या वेटेड अॅव्हरेज साइझने गुणून हे मूल्य प्राप्त करण्यात येते. मूलतः ते निर्दिष्ट कालावधीत त्या शहरातील सर्व विक्री व्यवहारांचे मौद्रिक मूल्य समाविष्ट करते.