Maratha Reservation : संभाजीराजे छत्रपती आणि प्रकाश आंबेडकर यांची आज पुण्यात भेट
राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज खासदार संभाजीराजे छत्रपती आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज डॉ. प्रकाश आंबेडकर यांची मराठा आरक्षण प्रश्नी भेट होत असल्याने भेटीला एक वेगळे महत्त्व प्राप्त झालं आहे.
पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्राचा दौरा केला आणि त्यानंतर ते राज्यातील विविध पक्षांच्या नेत्यांची भेट घेत आहेत. त्याच संदर्भात संभाजीराजे आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार आहेत. आज दुपारी चार वाजता प्रकाश आंबेडकर यांच्या पुण्यातील निवासस्थानी ही भेट होणार आहे.
भारतात सद्यस्थितीत असणारी आरक्षण प्रक्रिया ही राजर्षी शाहू महाराज यांच्या संकल्पनेतील आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच आरक्षणाच्या संकल्पनेचा भारताच्या राज्यघटनेत सहभाग केला आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज खासदार संभाजीराजे छत्रपती आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज डॉ. प्रकाश आंबेडकर यांची मराठा आरक्षण प्रश्नी भेट होत असल्याने भेटीला एक वेगळे महत्त्व प्राप्त झालं आहे.
संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली होती. आरक्षणासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावं अशी भूमिका त्यांनी या भेटीदरम्यान मांडली. त्यामुळे आज प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत होणाऱ्या भेटीत नेमकी काय चर्चा होते, ते पाहावं लागेल.
...तर 6 जूनला रायगडावरुन आंदोलनाची भूमिका जाहीर करु : संभाजीराजे
6 जूनपर्यंत राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी अन्यथा आम्ही किल्ले रायगडावरुन आपली भूमिका स्पष्ट करु, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. "आरक्षणाबाबत सरकारने योग्य ती कारवाई केली नाही आणि अॅक्शन प्लॅन ठरवला नाही तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी रायगडावरुनच कोरोनाची तमा न बाळगता आंदोलनाची भूमिका जाहीर करु," असं खासदार संभाजीराजे यांनी सकल मराठा समाजाच्या पत्रकार परिषदेत सांगितलं.
...स्वतंत्र पक्षाचा निश्चित विचार केला जाईल : संभाजीराजे
भाजपचे नेते भेटत नाहीत असा सूर आळवल्यानंतर शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत संभाजीराजे यांना ते भाजपशी फारकत घेणार? संभाजीराज पक्षांतर करणार की स्वतंत्र पक्ष काढणार, असे प्रश्न विचारण्यात आले. त्यावर संभाजीराजे यांनी स्पष्ट उत्तर दिलं. "जर बहुजन समाजाची इच्छा असेल तर निश्चित विचार केला जाईल," असं संभाजीराजे यांनी म्हटलं.
नऊ दिवसात खूप काही होऊ शकतं : अजित पवार
सहा तारखेला अवकाश आहे ना. सहा तारखेला अजून नऊ दिवस आहेत, नऊ दिवसात खूप काही होऊ शकतं. नऊ दिवसात काही चर्चा होईल, मार्ग निघेल, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी संभाजीराजेंच्या इशाऱ्यावर दिली.