किडनी दान करुन सासूने सुनेला दिलं नवं आयुष्य
सासू आणि सुनेचं नातं हे विळा-भोपळ्याचं नातं म्हणून ओळखलं जातं. वरवर सगळं छान पण आतून मात्र धूसफूस असंच या नात्याचं स्वरूप, असा अनेकांचा समज असतो. मात्र या सासू-सुनेच्या नात्यातील गैरसमजाला छेद देणारी सासू-सुनेची एक जोडी समोर आली आहे.
पुणे : सासू आणि सुनेचं नातं हे विळा-भोपळ्याचं नातं म्हणून ओळखलं जातं. वरवर सगळं छान पण आतून मात्र धूसफूस असंच या नात्याचं स्वरूप, असा अनेकांचा समज असतो. मात्र या सासू-सुनेच्या नात्यातील गैरसमजाला छेद देणारी सासू-सुनेची एक जोडी समोर आली आहे. पुण्यातील एका सासूने किडनी देऊन आपल्या सुनेला जीवदान दिलं आहे.
मुळच्या संगमनेरमध्ये राहणाऱ्या 50 वर्षीय बतूल सय्यद यांनी आपल्या सुनेला नवं आयुष्य दिलं आहे. बतूल यांची सून नझिमा सय्यद हिला गरोदरपणात थायरॉईडच्या आजारामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास सुरु झाला होता. त्याचा परिणाम किडनीवर होऊन 2013 पासून तिच्या किडनी निकामी होत गेल्या. तीन वर्ष नझिमा पूर्णपणे डायलिसिसवर अवंलबून होती.
नझिमावरील वैद्यकीय उपचार त्रासदायक आणि खर्चिक होते. किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यावर कायमस्वरुपी उपाय होता. नझिमाच्या आणि तिच्या आईचा रक्तगट एक होता. मात्र इतर आवश्यक घटक न जुळल्यामुळे तिची आई तिला किडनी देऊ शकत नव्हती. त्यानंतर बतूल यांनी आपल्या सुनेला किडनी देण्याची तयारी दर्शवली.
सगळ्या चाचण्यांनंतर त्या 'परफेक्ट डोनर' असल्याचं पुढे आलं. पंधरा दिवसांपूर्वी नझिमावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. सासू-सुनेच्या नात्यात या रुपानं समाजापुढे एक नवीन आदर्श ठेवला आहे.