Pune Crime News : शिक्षणाचं माहेरघर की गुन्हेगारांचं शहर; पुण्यात शहरात 20 हजाराहून अधिक गुन्हेगार
मागील काही वर्षांपासून पुण्यात वाढत असलेल्या गुन्ह्यांच्या घटना पाहता ही ओळख आता कायम राहिली नाही आहे. गुन्हेगारीला वचक बसण्यासाठी पुणे पोलिसांनी 21 हजार गुन्हेगारांची यादी तयार केली आहे.
Pune Crime News : शिक्षणाचं माहेरघर आणि शांतताप्रिय (Pune crime) अशी पुण्याची ओळख आहे. मात्र मागील काही वर्षांपासून पुण्यात वाढत असलेल्या गुन्ह्यांच्या घटना पाहता ही ओळख आता कायम राहिलेली नाही. मागील काही वर्षांपासून पुण्यात गुन्हेगारीत वाढ झाली आहे. त्यात सगळ्या (Pune Police) प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. सायबर क्राईम आणि विनयभंगाच्य गुन्ह्यांची संख्या जास्त आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे पुणे पोलीस मागील काही दिवसांपासून कोम्बिंग ऑपरेशन राबवत आहेत. यात आतापर्यंत हजारो गुन्हेगारांचा शोध घेतला आहे. मात्र याच गुन्हेगारीला वचक बसण्यासाठी पुणे पोलिसांनी 21 हजार गुन्हेगारांची यादी तयार केली आहे.
बेसिक पोलिसिंगच्या प्रयोगातून गुन्हेगारीला वचक बसवण्यासाठी नवनियुक्त पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पुढाकार घेतला आहे. शहरातील गुन्हेगारांवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे आणि त्यांच्यावर कारवाईदेखील होणार आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी गुन्हेगारी विरोधात चांगलीच कंबर कसल्याचं चित्र आहे. पुण्यातील गुन्ह्यांची चर्चा यंदाच्या अधिवेशनात झाली होती. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुण्याच्या गुन्हेगारीवर अधिवेशनात चर्चा केली होती. त्यानंतर पुणे पोलीस अॅक्शन मोडवर आल्याचं चित्र आहे.
प्रत्येक गुन्ह्यांची अन् गुन्हेगारांची माहिती संकलित होणार
बेसीक पोलिसींगच्या प्रयोगातून पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी 21 हजार गुन्हेगारांची यादी तयार केली आहे. त्यानुसार प्रत्येक गुन्हेगाराची संपूर्ण माहिती संकलित केली जाणार आहे. त्यात विनयभंग, सायबर क्राईम, चोरीचे प्रकरणं, बलात्कार, घरफोड्या या सगळ्या घटनेतील गुन्हेगारांचा समावेश असणार आहे.
हाणामारीच्या आणि लुटमारीच्या घटनेत वाढ
पुण्यात मागील काही दिवसांपासून बाकी गुन्ह्यांसोबतच किरकोळ वादातून हाणामारीच्या आणि लुटमारीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. या घटनांवर आळा घालणं पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. पुण्यातील अनेक परिसरात गुन्हेगारांची धुमाकूळ घातला आहे. किरोकोळ कारणावरुन हाणामारी, पूर्ववैमस्यातून हत्येच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यातच रोज पुण्यातील वर्दळीच्या परिसरातून लुटमारीच्या घटनांनी पुणेकर त्रस्त असल्याचं चित्र आहे.
कोयता गँगची दहशत कायम
मागील काही महिन्यापासून पुण्यात कोयता गँग सक्रिय आहे. पुण्यातील विविध परिसरांमध्ये त्यांनी दहशत निर्माण केली आहे. त्यांच्यातील अनेकांवर आतापर्यंत कारवाई झाली आहे. मात्र या टोळीतील लोक अजूनही पुण्यातील रस्त्यांवर दहशत निर्माण करताना दिसत आहे. या सगळ्या घटनांमुळे शांतताप्रिय अशी पुण्याची ओळख पुसली जात आहे.