Manoj Jarange Video: ज्या जातीचा नेता मराठ्यांना त्रास देणार त्याला विधानसभेला पाडणार, धनंजय मुंडेंचं नाव न घेता मनोज जरांगेंचा इशारा
Manoj Jarange: कोणत्या जातीच्या नेत्याविरोधात स्टेटस ठेवण चुकीचे आहे. समोरचे लोक किती चुका करतात करु द्या, मात्र तरी पण मराठा समाजाने शांत राहा, असे आंदोलन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केले आहे.
जालना : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं असून आज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान उपोषण स्थळी अद्याप सरकारच्या वतीनं कोणीही आलं नसल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलंय. तर यावेळी बोलतना त्यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) जोरदार निशाणा साधलाय .जो मराठा समाजाला त्रास देईल त्या नेत्याला विधानसभेत पाडणार असल्याचा इशारा जरांगेंनी दिला आहे. ते जालन्यात माध्यमांशी बोलत होते.
मनोज जरांगे यांनी माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडेंवर देखील निशाणा साधला आहे.काही जण देशी पिऊन माझ्यावर टीका करतात. त्याच्या नेत्याने त्याला आवर घालावा. तुझा नेता परळीत कसा निवडून येतो हे बघतोच. ज्या जातीचा नेता मराठ्यांना त्रास देईल त्या जातीचा नेता विधानसभेला पाडणार. आमच्या लोकांना बीड माजलगाव ,केज, गेवराई बीडमध्ये मारहाण झाली. त्यांच्या नेत्याचे काम त्यांच्या जातीला आवाहन करावे, ते नेते परदेशात जाऊन झोपतात. तिला मी काय केलं, मी कोणाला म्हटलं पाडा म्हणून तिला, असे म्हणत पंकजा मुंडे यांचे नाव न घेता मनोज जरांगेंनी टीका केली आहे.
ज्या जातीचे लोक मराठा समाजाला त्रास देतील, त्यांचा नेता पाडणार : मनोज जरांगे
जातीवादाच्या नावाखाली मराठा तरुणांना मारहाण सुरु आहे. गेवराई तालुक्यातील तरुणांना शेतात जाताना मारहाण केली. एखाद्या अर्ध्या पोराने स्टेटस ठेवलं असेल, त्यामुळे मराठा समाज सर्वच विरोध करतोय असे नाही. कोणीतरी खोटं स्टेटस ठेवायचं त्याच्या नावाखाली मोर्चे काढायचे, बीडच्या मराठ्यांनी शांतता राखावी, असे माझे सर्वांना आवाहन आहे. बीड तालुक्यात महाजन वाडीत मराठा समाजाला यांनी खूप त्रास दिलाय. मतदान का केलं नाही म्हणून, काही दिवस सहन करा. हार- जीत होत असते, मान्य करायची असते असे हल्ले करून ज्या जातीचे लोक मराठा समाजाला त्रास देतील त्यांना विधानसभेत पाडणारच.
धर्मपरिवर्तन नाही, सत्ता परिवर्तन करायला आलो: मनोज जरांगे
दर्ग्यावर चादर चढवल्याच्या सोशल मीडियावरील व्हिडीओवर जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे म्हणाले, मी किती कट्टर हिंदू मला माहिती आहे.ज्याच्या त्याच्या धर्मचा गर्व असला पाहिजे, मला माझ्या धर्मचा स्वाभिमान आहे. मी धर्मपरिवर्तन करायला आलो नाही, सत्ता परिवर्तन करायला आलो आहे.
मराठा समाजाला शांतता राखण्याचे मनोज जरांगेचे आवाहन
कोणत्या जातीच्या नेत्याविरोधात स्टेटस ठेवण चुकीचे, मराठा समाजाला माझं अवाहन आहे शांतता राखा, पण बाकीच्यांना शांतता राखा म्हणायचे काम नाही, त्यांचे नेते त्यांना म्हणत नाही. माझं लढणे काम आहे, मी करतो. मराठा समाजाने शांत राहावं , त्यांनी त्यांची शेतीची कामे करावी. माझ्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याची सरकारची भूमिका असू शकते. सरकारची भावना माहीत नाही, मी माझे कर्तव्य पार पाडत आहे, असे देखील जरांगे म्हणाले.