(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Crime : पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाची मोठी कारवाई! 1 लाखांचा मेफेड्रॉन जप्त; 26 वर्षीय तरुण अटकेत
Pune Crime News : पुणे शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने मोठी कारवाई केली आहे. एक लाख रुपये किमतीचे मेफेड्रॉन किंवा म्याव म्याव हे ड्रग जप्त केले आहे. या प्रकरणी 26 वर्षीय तरुणाला अटक केली.
Pune Crime News : पुणे (Pune crime) शहर पोलिसांच्या (Pune Police) अंमली पदार्थ विरोधी कक्षाने मोठी कारवाई केली आहे. एक लाख रुपये किमतीचे मेफेड्रॉन किंवा म्याव म्याव हे ड्रग जप्त केले आहे. या प्रकरणी 26 वर्षीय तरुणाला अटक केली. या आरोपीच्या माध्यमातून या ड्रग पुरवठ्याच्या साखळीत आणखी किती लोक कार्यरत आहेत याची चौकशी पोलिसांकडून सुरु आहे.
धनकवडीतील राऊतबाग परिसरात एक व्यक्ती मेफेड्रॉन विकण्याचा प्रयत्न करत असल्याची गुप्त माहिती अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी सापळा रचून पर्वती दर्शन परिसरात राहणाऱ्या रोहन काळूराम खुडे या व्यक्तीला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुडे एका कापड व्यापाऱ्याच्या दुकानात काम करतो आणि त्याने अलीकडेच कपड्याच्या विक्रीसाठी रस्त्याच्या कडेला स्टॉल सुरु केला होता.
नार्कोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यांतर्गत सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर खुडेचा शोध घेण्यात आला. त्याच्याकडून अवैध बाजारात 1.04 लाख रुपये किमतीचे 6.9 ग्रॅम 'म्याव म्याव' जप्त करण्यात आलं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
त्यानंतर पोलीस पथकाने त्याला अटक केली आणि सहकारनगर पोलीस ठाण्यात खुडेविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आम्ही संशयिताची पुरवठा साखळी आणि नेटवर्क पाहत आहोत. तो मुंबईतील एका व्यापाऱ्याकडून विकत घेत असे आणि पुण्यात छोट्या पॅकेटमध्ये विकत असे, असं प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे, असंही पोलीस म्हणाले
मेफेड्रोन, ज्याला ‘म्याव म्याऊ’ किंवा ‘व्हाईट मॅजिक’ म्हणूनही ओळखले जाते. हे अॅम्फेटामाइन आणि कॅथिनॉन श्रेणीचे कृत्रिमरित्या तयार केलेलं उत्तेजक ड्रग आहे. 2010 च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत, NDPS कायद्यांतर्गत निषिद्धांच्या यादीत हे ड्रग समाविष्ट नव्हते. परंतु मोठ्या प्रमाणात ड्रगच्या अनेक जप्ती आणि मोठ्या शहरांमध्ये अंमली पदार्थ म्हणून त्याचा वापर करण्याच्या वाढत्या घटनांमुळे अधिकाऱ्यांना 2015 मध्ये यादीत समाविष्ट करण्यास सांगण्यात आलं होतं.
ड्रग पुरवठा साखळीचा शोध सुरु
पुण्यात सध्या ड्रग्सवरील कारवाईचं प्रमाण वाढवलं आहे. माहिती मिळताच सापळा रचून पोलिसांकडून तातडीने कारवाई केली जात आहे. त्यामुळे ड्रग्स विक्रेत्यांवर आळा बसत आहे. या प्रकरणात जे आरोपी सापडत आहेत. त्यांच्यामार्फत ड्रग्स विक्रेत्यांची साखळी पकडण्यासाठी मदत घेत आहे. ड्रग्स पुरवठा साखळीचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.