Indapur Political News : इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकले चंद्रकांत पाटील; फोटोमागचं नेमकं कारण काय?
इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा फोटो टाकण्यात आला आहे. या फोटोमुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
Indapur Political News : इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवरती भाजप नेते आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांचा फोटो टाकण्यात आला आहे. या फोटोमुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. इंदापूर शहरातील विकास कामांसाठी 15 कोटी 46 लाख 99 हजार रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे. हा निधी मंजूर केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसकडून चंद्रकांत पाटील यांचा फोटो टाकून चौकात चौकात बॅनर लावत जाहीर आभार मानण्यात आले आहेत.
या बॅनरवरती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचा खासदार सुप्रिया सुळे यांसह माजी राज्यमंत्री इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे आणि पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांचे देखील फोटो आहे. इंदापूर शहरात आणलेल्या विकास निधीवरुन राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय भरणे आणि भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू असून आता चक्क राष्ट्रवादी काँग्रेस एक पाउल पुढे टाकत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभाराचे बॅनर लावण्याने याची चर्चा जोरदार सुरू झाली आहे.
सध्या इंदापूर तालुक्यात विकास निधी कोणी आणला यावरुन श्रेयवादाची लढाई सुरु आहे. एकीकडे विकास निधी माझ्या माध्यमातून आणला आहे, असा दावा इंदापूरचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे करत आहेत तर दुसरीकडे विकास निधी भाजपने दिला आहे त्यामुळे हा विकास निधी मी आणला आहे, असा दावा भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे.
मागील 8 महिन्यांपासून शिंदे-फडणवीस सत्तेत आहे. त्यामुळे शिंदे- फडणवीस सरकारने असंख्य विषय मार्गी लावल्याचं हर्षवर्धन पाटील सातत्याने सांगत आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजेंच्या स्मारकाचा विषय आणि इंदापूर तालुक्याचा कोणताही प्रश्न असेल त्या सगळ्या प्रश्नांचा पाठपुरावा करुन विकास निधी आणल्याचा दावा करतात तर हा सगळा विकास निधी राष्ट्रवादीने आणला आहे, असा दावा दत्तात्रय भरणे करत आहेत. यासंदर्भात पत्रव्यवहार केल्याचे फोटोदेखील या बॅनरवर छापल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे ही श्रेयवादाची लढाई साहजिक आहे. मात्र शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं आहे. त्यामुळे दोघांमध्ये श्रेयवाद सुरु आहे.