Amol Kolhe आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं नाही तर या महाभागांना पांडुरंग समजलाच नाही; अमोल कोल्हेंचा पलटवार...
राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर पलटवार केला आहे. आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं नाही, तर या महाभागांना पांडुरंग समजलाच नाही, असं म्हणत अमोल कोल्हेंनी पलटवार केला आहे.
Amol Kolhe : राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीचे (Maharashtra Political Crisis) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर पलटवार केला आहे. ते म्हणाले 'आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं नाही तर या महाभागांना पांडुरंग समजलाच नाही. मनापासून विठ्ठलाची निस्सिम भक्ती केली असती तर पांडुरंग पावला असता. अजित पवारांच्या सभेत छगन भुजबळांनी आमचा विठ्ठल बडव्यांनी घेरलं असं वक्तव्य केलं त्यावर अमोल कोल्हेंनी पलटवार केला आहे.
Amol Kolhe: स्वार्थाचा पाऊस पडला की निष्ठेचा चिखल होतो
ते पुढे म्हणाले की, ईडी, सीबीआय आणि स्वार्थाचा पाऊस पडला की निष्ठेचा चिखल होतो. हे चित्र सध्या राज्यात बघायला मिळत आहे. रविवारी जे घडलं ते पहिल्यांदा घडलं नाही. वर्षभरापूर्वी महाराष्ट्रात घडलं. त्यापूर्वी मध्यप्रदेशात आणि त्याआधी कर्नाटकात घडलं. हे का घडतं?, याचं उत्तर मिळालं नाही. मात्र सगळं बंड घडल्यामुळे रडत बसणारे आम्ही नाही. हे का घडलं?, याचा विचार करायला हवा, असंही ते म्हणाले.
Amol Kolhe : आमिष आणि धोका हे सोडून जे राहतात...
अमोल कोल्हे म्हणाले की, 'वाट सोडायला दोन कारणं असतात. शॉर्ट कटने पोहचू याचं आमिष असतं नाही तर पुढे जाऊन पकडले जाऊ याची भिती असते. आमिष आणि धोका हे सोडून जे या वाटेवर कायम राहतात. त्यांच्या पाठिमागे तत्वांची आणि नैतिकतेची बैठक असते. ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. अशाच प्रकारे जर पक्ष फोडले गेले तर नैतिकता कुठे गेली आणि मतदारांच्या मतांचं काय, असा प्रश्नदेखील कोल्हेंनी उपस्थित केला आहे.
'पवारांच्या पाठीशी उभं राहणं माझं कर्तव्य'
ते म्हणाले की, 'कुरुक्षेत्रातल्या अर्जुनासारखी अनेकांची अवस्था झाली असेल. मात्र तिथेही जेव्हा य़ुद्ध निर्माण झालं. तेव्हा रथ दोन्ही पक्षांच्या मधोमध घेऊन जा असं सांगितलं होतं. कृष्णाने रथ मधोमध नेला अर्जुनाने दोन्हीकडे पाहिलं. तेव्हा समोर अनेक गुरुस्थानी असलेली माणसं होती तर एकीकडे रक्ताची नाती होती. त्यावेळी भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की ही लढाई कर्तव्याची आहे आणि नितीची आहे. त्यासोबतच ही लढाई धर्माची आणि अधर्माची आहे. उद्या जर लोकशाही टिकवायची असेल तर शरद पवारांच्या पाठिशी उभं राहणं हे माझ्या सारख्या प्रत्येकाचं कर्तव्य असल्याचं ते म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Maharashtra NCP Crisis : आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय; छगन भुजबळांचा नेमका रोख कोणाकडे?