(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raj Thackeray : भाजपनंतर आता राज ठाकरेंचे टार्गेटही बारामती; पुणे दौऱ्यात मनसेत इनकमिंग
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी मनसेमध्ये मोठी इनकमिंग झाली आहे. भाजपनंतर मनसेचंही टार्गेट बारामती असल्याचं चित्र आहे.
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवस पुणे दौऱ्यावर असून त्या दरम्यान मनसेमध्ये मोठी इनकमिंग झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे भाजपनंतर मनसेचंही टार्गेट बारामती असल्याचं चित्र आहे. या दौऱ्यात आज बारामती लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी मनसेत प्रवेश केला आहे. पुणे महापालिका, मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर महत्वाच्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचे महाराष्ट्रातील दौरे देखील वाढले आहेत.
राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला आहे. खडकवासला, भोर, वेल्हा आणि मुळशीतील काही पदाधिकारी यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे . पुण्यातील काही पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकादेखील राज ठाकरे यांनी आज केल्या आहेत. पक्ष बांधणीसाठी अनेकांना सूचनादेखील त्यांनी यावेळी केल्या आहेत.
मनसेचं टार्गेट बारामती
बारामतीत मनसे ताकद वाढवण्याच्या तयारीत आहे. आगामी निवडणुकांसाठी त्यांची तयारी सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वीत मनसे नेते वसंत मोरे बारामतीत गेले होते. त्यानंतर आज बारामतीतील अनेकांनी मनसेत पक्ष प्रवेश केला. त्यामुळे यंदाच्या निवणुकांसाठी मनसेचं टार्गेट बारामती असल्याचं चित्र आहे.
वेळेच्या आधी पोहचल्याने पदाधिकाऱ्यांची धावपळ
राज ठाकरे सकाळी लॉ कॉलेज रोडवरील राजमहल या त्याच्या घरातून लवकर बाहेर पडले होते. घराबाहेर त्यांना वासुदेवाचं दर्शन घडलं. यावेळी वासुदेवाने आणि राज ठाकरेंनी फोटोसेशन केलं आणि त्यानंतर राज ठाकरे नवी पेठेतील मनसे कार्यलयाकडे रवाना झाले. यावेळी कार्यालयातील पदाधिकारी राज ठाकरेंच्या स्वागताच्या तयारीत होते. मात्र राज ठाकरे वेळेच्या आधीच पोहचल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती.
शक्तिप्रदर्शन करत वसंत मोरेंची एन्ट्री
मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांच्याकडे बारामती लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. राज ठाकरेंनी शहरप्रमुख साईनाथ बाबर आणि इतर पदाधिकारी यांची बैठक घेतली. यंदा मनसेचंही बारामती लोकसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. या मतदारसंघाची जबाबदारी वसंत मोरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. यावेळी मनसेत मोठ्या प्रमाणावर प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडून मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. नवी पेठेतील पक्ष कार्यालयात नेहमी प्रमाणे वसंत मोरे यांनी हटके प्रवेश केला. मोठं शक्तिप्रदर्शन करत मोरे पक्षकार्यालयात पोहचले. अनेक बारामतीतील पदाधिकाऱ्यांचा प्रवेश आज मनसेत होत आहे. काही गावातील कार्यकर्त्त्यांनी देखील मनसेत प्रवेश घेतला आहे. शहरातील कार्यकर्ते आणि नेत्यांची बैठक घेतली त्यात अनेक जणांच्या नियुक्त्या करण्यात. यांच्या सगळ्यांच्या बळामुळे बारामतीत आता आम्ही ताकद वाढवण्याच्या तयारीत आहोत, असं वसंत मोरे यांनी सांगितलं.