Pune Bypoll election : दगडूशेठ मंडळाच्या गोडसे परिवाराचा रविंद्र धंगेकरांना पाठिंबा? भाजपची धाकधूक वाढण्याची शक्यता
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे विश्वस्त अक्षय गोडसे यांनी कसबा पेठ निवडणुकीतील कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Pune Bypoll election : पुण्यातील पोटनिवडणुकीत रोज नवनव्या घडामोडी घडत आहेत. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे विश्वस्त अक्षय गोडसे यांनी कसबा पेठ निवडणुकीतील कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Pune Bypoll Election) यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी दिलेल्या शुभेच्छा सध्या पोटनिवणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेचा विषय ठरल्या आहे. कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर आणि भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यात तगडी लढत आहे. त्यात भाजपचे हेमंत रासने हे दगडूशेठ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत. मात्र हेमंत रासनेंना सडून त्यांनी रविंद्र धंगेकरांना जाहीर शुभेच्छा दिल्याने पुण्यात राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
अक्षय गोडसे हे दगडूशेठ हलवाई मंडाळाचे माजी उत्सवप्रमुख दिवंगत अशोक गोडसे यांचे चिरंजीव आणि दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे संस्थापक प्रतापराव गोडसे यांचे नातू आहेत. विशेष म्हणजे कसबा पेठचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत. अक्षय गोडसे शुभेच्छा देताना म्हणाले की, रवी भाऊ आणि आमच्या गोडसे परिवाराचं गेल्या अनेक वर्षाचं नातं आहे. माझे आजोबा दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे संस्थापक दिवंगत तात्यासाहेब गोडसे यांच्यापासून ते अशोकभाऊ गोडसे ते माझ्यापर्यंत स्नेहाचं आणि अत्यंत चांगलं नातं आहे. मला चांगलं आठवतं, तात्यासाहेबांच्या प्रत्येक वाढदिवसाला रवीभाऊ जवळ-जवळएक हजार भगवद्गीतेचे पुस्तक त्यांच्या वार्डात नागरिकांना वाटप करायचे, असं ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, रविंद्र धंगेकरांचे आणि आमचे कौटुंबिक संबंध चांगले आहेत.घरातील प्रत्येक कार्यक्रमात ते घरातील सदस्य असल्यासारखं काम करतात. मागील अनेक पिढ्यांपासून आमचा आणि त्यांचा चांगला सलोखा आहे. आमच्या सगळ्या परिवाराचं त्यांना पाठबळ आहे. त्यांच्या या निवडणुकीसाठी आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत असल्याचं त्यांनी व्हिडीओच्या माध्यामातून सांगितलं आहे.
भाजपची धाकधूक वाढणार?
पुण्यात पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यात रोड शो, नेत्यांच्या सभा घेतल्या जात आहे. मात्र कसबा मतदारसंघातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आजची सभा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे महत्त्वाच्या कसबा विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याची या निवडणुकीत एकही सभा होणार नाही हे स्पष्ट झालं आहे. त्यात रविंद्र धंगेकरांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे रोड शो घेणार आहेत. जर अक्षय गोडसे यांनी रविंद्र धंगेकरांना पाठिंबा दिला तर भाजपची धाकधूक वाढण्याची शक्यता आहे.