Pune Institutional Quarantine : ज्यांची घरे लहान आहेत त्यांच्यासाठी संस्थात्मक विलगीकरण आवश्यक, आरोग्यमंत्र्यांचा सल्ला
पुणे जिल्ह्यात आता गृह विलगीकरण कमी करून संस्थात्मक विलगीकरणावर भर दिला जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. संस्थात्मक विलगीकरण कोणत्या रुग्णांसाठी गरजेचं आहे याबाबत त्यांनी महत्त्वाचा सल्ला दिला.
पुणे: पुणे जिल्ह्याचा वाढता कोरोना संसर्ग पाहता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. "केवळ पुण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात वैज्ञानिक पद्धतीनुसार ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग केलं गेलं पाहिजे, कोरोनाच्या चाचण्यांची संख्या ही कमी होणार नाही याची जबाबदारी घ्यायला हवी" असाही उल्लेख त्यांनी केला. यावेळी होम क्वॉरंटाईन होणाऱ्या रुग्णांबद्दल आरोग्यमंत्र्यांनी महत्त्वाचा सल्ला दिला.
कोरोना रुग्ण आढळल्यास त्याने योग्यरित्या गरज लागेल ते सर्व उपचार घेणं गरजेचं आहे. घरी उपचार घेण्यास शक्य असल्यास जरूर घ्यावे मात्र त्यामुळे आपण इतरांच्या संपर्कात तर येत नाही ना याची खबरदारी घ्यायला हवी असं आरोग्यमंत्री म्हणाले. गृह विलगीकरणासाठी रुग्णाला घरात पुरेशी जागा असणं गरजेचं आहे. पुण्यात मुख्यत: संस्थात्मक विलगीकरण म्हणजेच इन्स्टिट्यूशनल क्वॉरंटाईन करण्यावर भर दिला जाईल, जेणेकरून रुग्णसंख्या नियंत्रणात येण्यास मदत होईल, असं आरोग्यमंत्री म्हणाले.
सर्वच रुग्णांना सरसकट संस्थात्मक विलगीकरण करणं अनिवार्य नसून केवळ ज्यांची घरं लहान आहेत, कुटुंबियांची संख्या जास्त आहे अशा रुग्णांना घरीच उपचार न घेता संस्थात्मक विलगीकरणात दाखल होणं गरजेचं आहे. ज्यांच्या घरांमध्ये रुग्णाला पूर्णपणे एक खोली वेगळं राहण्यासाठी उपलब्ध आहे अशांसाठी हे लागू होणार नाही, त्यांनी घरी उपचार घेतल्यास कोणतीही अडचण नाही. मात्र ज्यांची घरं लहान आहेत, घरातील कुटुंबियांची संख्या जास्त आहे, घरी राहून विलगीकरण शक्य नाही, अशा नागरिकांनी संस्थात्मक विलगीकरणात सहभागी होणं महत्त्वाचं आहे.
संस्थात्मक विलगीकरण वाढवण्यात येणार
होम क्वारंटाईन कमी करुन इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन वाढवायला हवे, अशी सगळ्या लोकप्रतिनिधींची आग्रही मागणी आहे. बऱ्याचवेळा होम क्वारंटाईन असलेला रुग्ण बाहेर फिरत असल्याच्या तक्रारी येत आहे. त्यामुळे अनेकांनी ही मागणी केली होती. प्रत्येक हॉस्पिटल्सची बिलं तपासण्यासाठी डेडीकेटेड ऑडीटर देण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत. अनेक रुग्णालयांकडून अव्वाच्यासव्वा बिल आकारली जात आहेत. ऑडीटरने हे रोखावे ही अपेक्षा आहे.
अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिसचे रुग्ण उपचार घेतायत. मात्र, अनेक मोठी हॉस्पिटल्स सरकारी योजना त्यांच्याकडे उपचार घेणाऱ्या रुग्णांना लागू करत नाहीत. त्या कराव्यात यासाठी चॅरीटी कमिशनरांना सूचित करण्यात आलं आहे. मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांनी स्वतःच्या स्टाफला स्वतःच्या खर्चाने लस द्यावी अशा सूचना औद्योगिक क्षेत्रात देण्यात आल्या आहेत. अनेक खाजगी हॉस्पिटल्स लसीसाठी जास्तीची रक्कम वसूल करतायत. प्रशासनाला त्यावर कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिलीय. दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाउन पंधरा दिवसांसाठी वाढवण्यात येईल. परंतु, निर्बंधांमधून सूट देण्याचा निर्णय हा स्थानिक प्रशासनाचा असेल, असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.