Kedar Jadhav : भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील पुण्यात सापडले; पोलिसांच्या शोधमोहिमेस यश
Kedar Jadhav : क्रिकेटपटू केदार जाधव याचे वडील महादेव जाधव हे पुण्यातच सुखरुपपणे सापडले आहेत.

Kedar Jadhav : टीम इंडियाचा (Indian Cricket Team) अष्टपैलू खेळाडू केदार जाधव (Kedar Jadhav) याचे वडील महादेव जाधव हे सापडले आहेत. महादेव जाधव हे पुण्यातून बेपत्ता झाले होते. याबाबतची तक्रार पोलिसांत दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. पुणे पोलिसांनी केलेल्या शोधमोहिमेस यश आले. महादेव जाधव यांना मुंढवा पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
पुण्यातील कोथरूड भागातून आज (सोमवारी) सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास ते बेपत्ता झाल्याची माहिती होती. केदार जाधवचे वडील महादेव जाधव यांच्याकडे मोबाईल नसल्यामुळे त्यांच्याशी कुठला ही संपर्क होऊ शकलेला नव्हता. त्यांच्या शोधासाठी पोलिसांकडून शोध पथके रवाना करण्यात आली. परिसरातील सर्व सीसीटीव्ही फूटेज पोलिसांकडून तपासण्यात आले.
वारजे, कोथरूड, सिंहगड रोड, उत्तम नगर या पोलीस ठाण्यांना महादेव जाधव हे बेपत्ता झाल्याची माहिती कळवण्यात आली. त्यानंतर या पोलीस ठाण्याचे कर्मचारीदेखील महादेव जाधव यांचा शोध घेत होते.
महादेव जाधव हे कोथरूड येथील निवासस्थानातून बाहेर पडल्यावर ते बॅरोमीटर हॉटेल पासून पुढे साने डेअरी, कोथरूड स्टँड (सुतार बसस्थानक) आणि त्यानंतर कर्वे पुतळा या ठिकाणी त्यांचे शेवटचे लोकेशन सीसीटीव्ही द्वारे मिळाले होते. त्यानंतर पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अखेर त्यांचा शोध लागला. महादेव जाधव सुखरुप असून त्यांना पोलिसांनी मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये आणले. तेथून जाधव यांच्या कुटुंबियांना याची माहिती देण्यात आली.
काही दिवसांपूर्वी केदार अडकला होता आणखी एका अडचणीत
काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या रणजी स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळणाऱ्या केदार जाधवने आसाम विरुद्ध अप्रतिम द्विशतक झळकावलं होतं. पण त्यानंतर काही दिवसांत त्याने खाजगी कारण देत तो महाराष्ट्र विरुद्ध तामिळनाडू रणजी सामना अर्ध्यावरती सोडून बाहेर पडला. ज्यानंतर बारामती येथे तो एका कार्यक्रमात दिसून आला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांच्यासोबत केदार दिसून आला. दरम्यान एक महत्वाची क्रिकेट स्पर्धा सुरु असताना असं खोटं कारण देत त्यातून बाहेर पडणं चुकीचं आहे. याबाबत बीसीसीआयकडे तक्रार करणार असून कितीही मोठा खेळाडू असला तरी असं वागणं बरोबर नाही. असं करायचं असल्यास क्रिकेट सोडून घरी बसावं, असंही इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील म्हणाले होते.
केदार जाधवची कमाल फलंदाजी
बराच काळ मैदानापासून दूर असणाऱ्या केदारनं काही दिवसांपूर्वी आसामविरुद्धच्या रणजी सामन्यात दमदार फलंदाजी केली होती. जाधवची फलंदाजी सर्वांसाठीच चर्चेचा विषय बनली होती. सामन्यात त्याने एकदिवसीय शैलीत फलंदाजी करताना 283 चेंडूत 283 धावा केल्या. या खेळीत त्याने 21 चौकार आणि 12 षटकार मारले. त्याच्या या स्फोटक खेळीमुळे महाराष्ट्र मजबूत स्थितीत पोहोचला होता. केदारने बऱ्याच कालावधीनंतर एवढी मोठी खेळी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
