स्वदेशी आणि विदेशी वस्तू कशा ओळखायच्या? पुण्यातील ग्राहक पेठेने लढवली 'ही' शक्कल
स्वदेशी आणि विदेश वस्तूंमधला फरक कळावा यासाठी पुण्यातल्या ग्राहक पेठेत वस्तूंच्या रॅकवर स्टिकर लावण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांना स्वदेशी आणि विदेशी वस्तू ओळखणे सोपं होत आहे आणि स्वदेशी वस्तूंचा खपही वाढत आहे.
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील उद्योगांना चालना मिळावी यासाठी आत्मनिर्भर भारतचा नारा दिला. मात्र बाजारपेठांमध्ये गेल्यावर स्वदेशी माल आणि विदेशी माल ओळखणे ग्राहकांसाठी कठीण असते. त्यामुळे ग्राहकांना स्वदेशी आणि विदेशी मालाता फरक कळावा आणि आत्मनिर्भर भारतच्या नाऱ्याला साथ दिल्याचं पुण्याच्या ग्राहक पेठेत दिसून आलं आहे. ग्राहक पेठेतील स्टॉल्सवर आता स्वदेशी आणि विदेशी असे स्टिकर पाहायला मिळत आहेत. स्वदेशी वस्तूंच्या जास्तीत जास्त खरेदी केल्या जाव्या यासाठी हा उपक्रम सुरू केल्याचं ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांनी सांगितलं.
ग्राहकांना स्वदेशी वस्तू घ्यायची इच्छा असते, मात्र बरेच वेळा कोणती वस्तू स्वदेशी आहे आणि कोणती वस्तू विदेशी आहे, हे त्यांना कळत नाही. या स्टिकरमुळे ग्राहकांचा हा संभ्रम दूर व्हावा, हा ग्राहक पेठेचा उद्देश आहे. येत्या काळात हळूहळू सगळ्यांनी स्वदेशी वस्तूंचाच वापर करावा, असं आवाहनही सूर्यकांत पाठक यांनी केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर भारताचा नारा दिला तेव्हापासूनच ग्राहक पेठेत हे स्टिकर लावण्यात आले होते. पण आता चीनसोबत निर्माण झालेल्या तणावामुळे स्वदेशी वस्तूंच्या वापरावरचा जोर वाढतो आहे. यामुळे ग्राहकांचा स्वदेशी वस्तूंकडचा कल वाढवा यासाठी ग्राहक पेठ प्रयत्नशील असल्याचं सूर्यकांत पाठक यांनी सांगितलं. ग्राहक पेठेने नेहमीच स्वदेशी वस्तुंना प्रोत्साहन दिलं आहे, असंही ते म्हणाले.
या स्टिकरमुळे स्वदेशी वस्तू ओळखणं सोपं झालं असून ज्या शक्य आहे त्या आम्ही स्वदेशी वस्तूच घेतो, असं काही ग्राहकांनी सांगितल. कोरोनानंतरच्या आर्थिक संकटामधून जर आपल्याला सावरायचं असेल तर स्वदेशी वस्तूंच्या खरेदीवर भर देणे गरजेचं असल्याचं काही ग्राहकांनी सांगितलं.