पिंपरी चिंचवड : देश-विदेशातील नामवंत कंपन्या विस्तारलेल्या पुण्यातील चाकण एमआयडीसीमध्ये कोरोनाने हैदोस घातला आहे. एमआयडीसीतील एका कंपनीत तब्बल 110 कामगारांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. ऑटोमोटिव्ह सीटिंग आणि ई-सिस्टम्स बनवणाऱ्या नामांकित कंपनीत ही धक्कादायक बाब समोर आली. नुकतंच एका कर्मचाऱ्याचा कोविड अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर कंपनीने 800 कामगारांच्या खाजगी प्रयोगशाळेत चाचण्या केल्या. त्यापैकी आणखी अहवाल प्रतीक्षेत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळल्याने कंपनीने कोरोनाच्या उपाययोजनांचं उल्लंघन केल्याचं प्रशासनाच्या तपासात समोर आलं आहे.


चाकण एमआयडीसीत उदरनिर्वाहासाठी येणारे काही कामगार पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे एमआयडीसीला कोरोना काही नवा नाही. पण एकाच कंपनीत शंभरहून अधिक रुग्ण सापडण्याची पहिलीच वेळ ठरली. ऑटोमोटिव्ह सिटिंग आणि ई-सिस्टम्स बनवणाऱ्या कंपनीत नुकतंच एका कामगाराला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर खबरदारी म्हणून कंपनीने सर्व कामगारांची चाचणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून 800 कामगारांच्या चाचण्या करण्यात आल्या. पिंपरी चिंचवड शहरातीलच एका खाजगी प्रयोगशाळेने ही प्रक्रिया पार पाडली. 29 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान या प्रयोगशाळेने इतक्या मोठ्या प्रमाणात कामगारांचे स्वॅब घेतले. त्यानंतर गेल्या दोन दिवसांत या कामगारांचे अहवाल हाती येऊ लागले. बघता-बघता 110 कामगारांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. पैकी अनेक अहवाल प्रतीक्षेत असल्याची माहिती खेड तालुका प्रशासनाने दिली. 110 मधील 51 कोरोना बाधित हे खेड तालुक्यातील आहेत, तर उर्वरित हे पिंपरी चिंचवड, पुणे आणि ग्रामीण भागातील आहेत.


एकाच कंपनीने कोरोना रुग्णांची शंभरी पार केल्याने प्रशासन ही हडबडून गेलं. प्रशासनाने तातडीनं कंपनी गाठली आणि याबाबतची विचारणा सुरू झाली. तेव्हा या कंपनीने कंटेन्मेंट झोनमधील कामगारांना ही कामावर बोलावल्याचं समोर आलं. सोशल डिस्टनसिंगला ही हरताळ फासल्याचं आकडेवारीवरून दिसून येतंय. तसेच इतक्या मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्या जात असताना प्रशासनाला अंधारात ठेवण्यात आलं. तसेच खाजगी प्रयोगशाळांना चाचणी करण्याबाबत निर्बंध घातले असताना, इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी कशा काय चाचण्या केल्या, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


पिंपरीत आणखी एका नगरसेवकाचा कोरोनामुळं मृत्यू


उरलेले अहवाल आल्यानंतर हा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाची लागण झालेले जिथं राहायला आहेत, तो भाग सील केला जाणार आहे. तर सर्व अहवाल हाती लागल्यानंतर जे निगेटिव्ह येतील त्यांना होम क्वॉरंटाईन केलं जाणार आहे. तर कंपनी सॅनिटाईज करण्यात येईल. पण कंपनी सुरू करायची असेल तर होम क्वॉरंटाईनमधील कामगारांना कामावर घेता येणार नाही. चाकण एमआयडीसीतच नव्हे तर राज्यातील पहिल्याच कंपनीत केवळ दोन दिवसांत शंभरहून अधिक रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे राज्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये खळबळ उडाली आहे.


संबंधित बातम्या