इंदापूर : कोरोना काळात महाविकास आघाडीच्या मंत्र्यांच्या गाडी खरेदीची चर्चा राज्यभर रंगत असताना, पुणे जिल्ह्यातील राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपली गाडी अपघातात जखमी झालेल्या व्यक्ती दिल्याचे उदाहरण इंदापूर तालुक्यात घडले आहे. मंत्री आणि त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यामुळे बऱ्याच वेळा सर्वसामान्य नगरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे बऱ्याच वेळा आपण पाहतो. परंतु भरणे यांनी स्वतःची गाडी अपघातग्रस्त व्यक्तीला देऊन मंत्री सर्वसामान्य जनतेसाठी आहे असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे
काल रात्री शुक्रवार (31 जुलै) रोजी इंदापूर तालुक्यातील जंक्शन या गावाजवळ बारामती-इंदापूर राज्यमार्गावर दोन दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला होता. या अपघातामध्ये बारामती तालुक्यातील सोनगांवचे रहिवासी विश्वनाथ सिताराम गोफणे हे जखमी झाले होते. हा अपघात बघण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती, मात्र कोणी ही मदतीसाठी येत नव्हते. जखमीच्या डोक्याला जबर मार लागल्याने रक्तस्त्राव सुरु होता. ते रस्त्यावरच बेशुद्ध अवस्थेत पडले होते, यावेळी रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाली होती.
याच वेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे पुण्याहून आपल्या घरी चालले होते. रस्त्यालगतची गर्दी पाहून भरणे यांनी आपली गाडी थांबवून गर्दी का झाली हे विचारलं. त्यानंतर या ठिकाणी अपघात झाला असून जखमी बेशुद्धावस्थेत पडलेला आहे असे त्यांना समजले. भरणे यांनी तात्काळ गाडीतून उतरुन या अपघाताची संपूर्ण माहिती घेत, अपघातग्रस्ताला आपल्या स्वतःच्या गाडीत घेऊन हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले. त्यानंतर भरणे तिथल्या एका दुचाकीवरुन घरी गेले.
भरणे यांनी तात्काळ अपघातग्रस्ताला आपली स्वतःची गाडी दिल्याने त्याचा जीव वाचला. घरी गेल्यानंतर भरणे यांनी जखमीच्या परिस्थितीची डॉक्टरांकडून माहिती घेऊन सध्या त्याची प्रकृती व्यवस्थित आहे. भरणे यांच्या या कृतीचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले आहे.