पिंपरी चिंचवड :पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचं निधन झालं. दहा दिवस ते कोरोनाशी मुकाबला करत होते, आज (4 जुलै) सकाळी मात्र त्यांची झुंज अपयशी ठरली. साने यांना 25 जून रोजी कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. सानेंना सुरुवातीला कोरोनाची अगदी कमी प्रमाणात लक्षणं आढळत होती. मात्र गेल्या चार दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला आणि आज त्यांची प्राणज्योत मालवली.


लॉकडाऊन सुरु झाला, तेव्हापासून दत्ता साने गरजूंना धान्य वाटप करत होते. अनेकांना आपापल्या गावी पाठवण्यासाठीही ते मागे नव्हते. लॉकडाऊन सुरु होऊन तीन महिने उलटले होते, तरीही साने यांनी मदतकार्यात खंड पडू दिला नव्हता. अशात ते अनेक गरजूंच्या संपर्कात येत होते. जून महिन्याच्या चौथ्या आठवड्यात त्यांना थोडा त्रास जाणवू लागला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सानेंनी कोरोनाची चाचणी केली. अहवालाची प्रतीक्षा सुरु झाली अन् सानेंनी जी अपेक्षा केली नव्हती तेच घडलं. 25 जूनला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झाल्याने साने कुटुंबीय आणि समर्थकांना धक्का बसला. चिंचवडच्या आदित्य बिर्ला रुग्णालयात उपचार सुरु झाले. सुरुवातीला कोरोनाची अगदी कमी प्रमाणात लक्षणं आढळत होती. त्यामुळे साने लवकरच ठणठणीत बरे होऊन मदतकार्यात सहभागी होतील अशी अपेक्षा होती. पण गेल्या चार दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. आधीच शुगर आणि बीपी त्यात न्युमोनिया यामुळे कोरोनाने त्यांच्या शरीरावर ताबा मिळवला. बघता-बघता उपचार सुरु असण्याला नऊ दिवस उलटले, पण दहाव्या दिवसाची सकाळ मात्र अखेरची ठरली. कोरोनाशी सुरु असलेल्या झुंजीत ते अपयशी ठरले. वयाच्या 48व्या वर्षी सानेंची प्राणज्योत मालवल्याने कुटुंबीय आणि समर्थकांना मोठा धक्का बसला.


दत्ता साने त्यांच्या खास शैलीसाठी ओळखले जायचे. यातूनच काका या नावाने त्यांची ओळख निर्माण झाली. हीच शैली चिखली परिसरातील मतदारांच्या पसंतीला पडली आणि त्यामुळेच ते तीनवेळा नगरसेवक झाले. नुकतंच त्यांनी विरोधीपक्ष नेत्याची जबाबदारी ही पार पाडली होती. पुढे आमदार होण्याचे त्यांचे स्वप्न होते. मात्र ते स्वप्न कोरोनाने हिरावून घेतले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे ते निकटवर्तीय मानले जायचे. तसेच सर्वच पक्षातील नेत्यांशी त्यांची जवळीक होती. खेळीमेळीच्या वातावरणात वावरणारा सहकारी गेल्याने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जाती आहे.