पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनामुळे तीन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला पुतण्याला कोरोनाची लागण झाली, याचा चुलत्याला बसला. यात त्यांचा मृत्यू झाला आणि नंतर भावाच्या मृत्यूने स्वतःला सावरु न शकलेल्या दोघा भावांचीही मृत्यूंशी झुंज संपली. 61, 66 आणि 63 अशी तिघांची वय होती. यांच्यासह कुटुंबातील 18 सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. इतर सर्वांनी कोरोनावर मात केली पण हे तिघे सख्खे भाऊ मात्र यातून वाचू शकले नाहीत. तिघांना आधी वेगवेगळे आजारही होते.


जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच कुटुंबातील मुलाला कोरोनाची लक्षणं आढळू लागली. त्यामुळे 4 जुलैला मुलाचे नमुने देण्यात आले. तर 6 जुलैला मुलाला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. एकत्रित कुटुंब असल्याने वडील आणि चुलत्यांना धक्का बसला. मग कुटुंबातील इतर 17 सदस्यांनी कोरोनाची चाचणी केली. 8 जुलैला या सर्वांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. कुटुंबातील सर्वच खाजगी रुग्णालयात दाखल झाले.


पुण्यात लॉकडाऊनमध्येच सर्वाधिक कोरोनाबाधित


पुतण्याला कोरोनाची लागण झाल्याचा धक्का बसला आणि आधीच पॅरालिसीस झालेल्या लहानग्या बंधूंची तब्येत खालावत गेली. अखेर 10 जुलैला वयाच्या 61व्या वर्षी त्यांचं निधन झालं. लहानगा बंधू सोडून गेल्याने दोन्ही मोठे भाऊ खचून गेले. मग रक्तदाबाचा त्रास असलेले 66 वर्षीय बंधूची प्रकृती चिंताजनक झाली. 12 जुलै रोजी त्यांनीही अखेरचा श्वास घेतला. दोन्ही भाऊ सोडून गेल्याने 63 वर्षीय भाऊ अस्वस्थ झाले. आधीपासून हृदयविकाराचा त्रास, त्यात कोरोनाने शरीरावर मिळवलेला ताबा आणि भावांच्या मृत्यूचं दुःख यातून ते सावरलेच नाहीत. 17 जुलैला त्यांची ही मृत्यूशी झुंज संपली.


दुःखाचा डोंगर कोसळलेल्या या कुटुंबातील इतर सर्व सदस्यांनी मात्र कोरोनावर यशस्वी मात केली. मोठ्या बंधूनी शासकीय अस्थापनात वरिष्ठ लिपिक पदावर अनेक वर्षे कार्य केलं आहे. तर दोन लहान बंधू खाजगी कंपनीत नोकरीला होते.


दरम्यान पुणे जिल्ह्यात रात्रभरात 473 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढून 51 हजार 885 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 1343 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


संबंधित बातम्या


पुणे, पिंपरी चिंचवड क्षेत्रात लॉकडाऊन; काय सुरु, काय बंद राहणार?


पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये पुन्हा लॉकडाऊन, अजित पवार यांचे आदेश