Pune Rain : पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग; रस्त्यांना नद्यांचे स्वरूप, अचानक सुरु झालेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ, मार्केट यार्ड पाण्याखाली, तुफान पावसात भाजीपाला वाहून गेला
Pune Rain : मार्केट मधील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साठलं आहे. शेतकऱ्यांचा भाजीपाल्यासह फळ पाण्यात वाहतानाचे चित्र मार्केट यार्ड परिसरात दिसून येत आहे.

पुणे: राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाला अधिक पोषक वातावरण मिळालं असून अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. सुरुवातीचा फटका मराठवाड्याला बसला, त्यानंतर सोलापूर, सांगलीसह मध्य महाराष्ट्रातील भागातही अतिवृष्टी झाली. कोकण किनारपट्टीवरही अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. ठाणे, नवी मुंबईत तर रस्ते जलमय झाले, तर पुणे शहर आणि परिसरात रविवारीपासून पावसाचा जोर वाढलेला आहे. दरम्यान, परतीच्या पावसाला सुरुवात झाली असली तरी सध्या राज्यावर कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम जाणवत आहे. पुण्यात आज पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यासह आज पुण्याजवळील घाट माथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मागील तासभरापासून पुणे शहरामध्ये तुफान पाऊस सुरू
रास्ता पेठ, डेक्कन आणि जंगली महाराज रस्त्यावर आणि पुण्यातील विविध भागात पावसाला सुरुवात झाली आहे. तर पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात पाणीच पाणी झालं आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. मागील तासभरापासून पुणे शहरामध्ये तुफान पाऊस सुरू आहे. मार्केट मधील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साठलं आहे. शेतकऱ्यांचा भाजीपाल्यासह फळ पाण्यात वाहतानाचे चित्र मार्केट यार्ड परिसरात दिसून येत आहे.
शेतीमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान
पुण्यात काल रात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावल्यानं शहरासह उपनगरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढला असून, रस्त्यांना अक्षरशः नद्यांचे स्वरूप आले. रात्री थोडा पाऊस झाल्यानंतर सकाळी वातावरण ढगाळ असलं तरी पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र दुपारी अचानक जोरदार सरी कोसळू लागल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक जण रेनकोट किंवा छत्री न घेता बाहेर पडले असल्याने त्यांना आडोशाला थांबावं लागलं. अचानक पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. मध्यवर्ती भागाबरोबरच धायरी, हडपसर, वाघोली, खराडी, चंदननगर, कॅम्प, औंध, बाणेर यांसारख्या उपनगरातही मुसळधार सरी कोसळल्या. अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली आणि सोलापूरला यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यातील मार्केट यार्डमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलं आहे. शेतीमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. कमी वेळात जास्त पाऊस पडल्याने मार्केट यार्ड परिसरामध्ये पाणीच पाणी झालं आहे.























