Indapur News : हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
Harshvardhan Patil : भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करूनच हर्षवर्धन पाटील राजकीय निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पुणे : इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे लवकरच तुतारी हाती घेणार अशी चर्चा सुरू असतानाच आता एक नवी अपडेट समोर आली आहे. महायुतीचे जागावाटप होईपर्यंत हर्षवर्धन पाटील कोणताही निर्णय घेणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे. इंदापूरची जागा विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना मिळणार असल्याचे अजित पवारांनी संकेत दिले होते.
हर्षवर्धन पाटील पक्षश्रेष्ठींशी बोलूनच पुढील निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 2019 साली आघाडीतून तिकीट मिळाले नव्हते म्हणून हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसमध्ये किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये हर्षवर्धन पाटील प्रवेश करणार असल्याची इंदापूरमध्ये चर्चा आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत इंदापूरमधून सुप्रिया सुळे यांना मोठं मताधिक्य मिळालं होतं. त्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी महायुतीच्या सुनेत्रा पवार यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. त्याचा परिणाम विधानसभेच्या निवडणुकीतही दिसण्याची शक्यता आहे.
दत्तात्रय भरणेंची दादांकडून उमेदवारी जाहीर
इंदापूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे हे आमदार आहेत. त्यामुळे जागावाटपामध्ये ही जागा पुन्हा एकदा अजित पवारांना मिळण्याची शक्यता आहे. तसेच विद्यमान आमदार म्हणून दत्तात्रय भरणे यांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याचमुळे अजित पवारांनी या आधीच दत्तात्रय भरणे यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे इंदापूरसाठी प्रयत्नशील असलेल्या हर्षवर्धन पाटलांसमोर अडचण निर्माण झाल्याचं दिसतंय.
इंदापूरची जागा ही महायुतीतील अडचणीची जागा असल्याचं भाजपनेही कबुल केलं आहे. पण यावर काहीतरी तोडगा काढू असा विश्वास भाजप नेत्यांनी हर्षवर्धन पाटलांना दिल्याचं समजतंय. पण हर्षवर्धन पाटलांनी हाती तुतारी घ्यावी आणि निवडणूक लढवावी अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
शरद पवार कुणाला संधी देणार?
इंदापुरातून शरद पवारांच्या तुतारी चिन्हावर विधानसभा लढण्यासाठी भाजपाचे हर्षवर्धन पाटील इच्छुक असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र आयात उमेदवाराला संधी देऊ नये असा आग्रह पदाधिकाऱ्यांनी धरल्यानं शरद पवार काय निर्णय घेणार याची उत्सुकता वाढली आहे. इंदापुरातील पदाधिकाऱ्यांनी बारामतीत जाऊन शरद पवारांची भेट घेतली. इंदापुरातून लढण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून सहा जण इच्छुक आहेत. आता शरद पवार त्यांच्यापैकी एकाच्या हाती तुतारी देणार की हर्षवर्धन पाटलांना संधी देणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.