पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमध्ये 1 कोटी 42 लाखांचा निधी परस्पर वळवला, मिलिंद देशमुख यांना अटक, 9 एप्रिलपर्यंत कोठडी
Pune: गोखले इन्स्टिट्यूट ही सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीच्या अधीनस्थ असून, संस्थेला दरवर्षी शासकीय अनुदान, विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मिळणारा निधी आणि विद्यार्थ्यांकडून मिळणारी फी यावर कामकाज चालते.

Pune: पुण्यातील नामांकित गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था (Gokhale Institute of Politics and Economics) येथील 1 कोटी 42 लाख रुपयांच्या निधीमध्ये फसवणूक केल्याच्या आरोपाखाली भारत सेवक समाज संस्थेचे सचिव मिलिंद देशमुख यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी देशमुख यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना 9 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मिलिंद देशमुख यांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे .
गोखले इन्स्टिट्यूट ही सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीच्या अधीनस्थ असून, संस्थेला दरवर्षी शासकीय अनुदान, विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मिळणारा निधी आणि विद्यार्थ्यांकडून मिळणारी फी यावर कामकाज चालते. या संस्थेच्या निधीचा गैरवापर करत देशमुख यांनी तब्बल 1 कोटी 42 लाख रुपये अन्य खात्यात वळवले, असा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे.
परस्पर रक्कम वळवली, मिलिंद देशमुखांना अटक
ही रक्कम नागपूर येथील ‘सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी’च्या मालकीच्या जमिनीला फ्री होल्ड करण्यासाठी वापरण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, देशमुख यांनी इतर सदस्यांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता 24 फेब्रुवारी 2023 रोजी मंजूर करण्यात आलेली ही रक्कम अन्य खात्यात वळवली. यामध्ये 1 कोटी 2 लाख रुपये नागपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात आणि उर्वरित 40 लाख रुपये धनादेशाद्वारे सोसायटीच्या इतर खात्यावर पाठवण्यात आले होते. पोलिसांनी सांगितलं की या व्यवहारात काही अधिकाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा तपशीलवार तपास सुरु आहे. या रकमेचा खर्च, व्यवहारातील मंजुरी प्रक्रिया, आणि त्यासाठी वापरलेले कागदपत्रे संशयास्पद असल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे. फसवणुकीच्या या प्रकरणात आणखी काहीजण सहभागी असू शकतात, असा पोलिसांचा संशय असून, अधिक चौकशीसाठी देशमुख यांची कोठडी आवश्यक असल्याचं पोलिसांनी न्यायालयात सांगितलं. फिर्यादी डाॅ. गायकवाड यांनी स्पष्ट केला आहे की, देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संस्थेच्या इतर सदस्यांची परवानगी न घेता, स्वतःच्या फायद्यासाठी निधीचा अपहार केला. या तक्रारीवरून डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा:























