Gautami Patil : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा; तरुण एकमेकांच्या खांद्यावर बसून नाचले अन् काहीच वेळात...
गौतमी पाटीलच्या आदाकारीचा थरार रंगला याच गौतमीच्या आदाकारीवर तरुणाई एकमेकांच्या खांद्यावर बसून थिरकले. मात्र काहीच वेळात गौतमीच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा होऊन एकमेकांना हाणामारी झाल्याचा प्रकार घडला.
Gautami Patil : गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) आदाकारीचा थरार रंगला. याच गौतमीच्या आदाकारीवर तरुणाई एकमेकांच्या खांद्यावर बसून थिरकले. मात्र काहीच वेळात गौतमीच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा होऊन एकमेकांना हाणामारी झाल्याचा प्रकार घडला. पुण्याच्या खेड तालुक्यात हा प्रकार घडला. हा सगळा राडा थांबवण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली आणि त्यानंतर हा राडा आटोक्यात आला. त्यामुळे गौतमी पाटीलचा कार्यक्रम पुन्हा एकदा वादात सापडला.
गौतमी पाटीलचा कार्यक्रम नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळत आहे. खेड तालुक्यातील गुंडाळवाडी येथे वेताळेश्वर महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्ताने रीलस्टार गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सुरुवातीला गौतमीचा कार्यक्रम शांततेत सुरु झाला. दरम्यान रिमिक्स गाण्यांवर तरुणाई गौतमी समोर चांगलीच थिरकली. हा प्रकार इथच थांबला नाही तर या कार्यक्रमात ग्रामीण डोंगराळ भागातील तरुणांनीही एकमेकांच्या खांद्यावर बसून डान्स करत चांगलाच धुडगूस घातला. यावेळी कार्यक्रम बंद करताच पुन्हा गाणं लावण्यावरुन स्टेज समोरच तरुण एकमेकांवर भिडले. त्यामुळे पुन्हा एकदा धुडगूस घातल्यामुळे गौतमीचा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात अडकला. यावेळी अखेर राजगुरुनगर पोलिसांनी मध्यस्थी करुन वाद मिटवला. मात्र कार्यक्रम संपल्याचे आयोजकांना जाहीर करावं लागलं.
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला विरोध मात्र...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला अनेक लोक विरोध करतात. मात्र त्याउलट ज्या तालुक्यात गौतमी पाटीलचा कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमात मात्र लोक प्रचंड गर्दी करतात आणि बेफान नाचताना दिसतात. आतापर्यंत गौतमीचे अनेक गावांमध्ये कार्यक्रम झाले आहेत. त्यातील काहीच कार्यक्रमात राडा किंवा तरुणांनी धूडगूस घातला नाही. उर्वरित सर्व कार्यक्रमात पोलिसांनाच मध्यस्थी करुन राडे सोडवावे लागतात.
सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर गौतमी पाटीलचा आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. तिच्या एका कार्यक्रमादरम्यान कोणीतरी खिडकीतून तिचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ काढला होता. त्यानंतर तिच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला होता. यासंदर्भात तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर संस्कृती विसरु नका, अशा मजकूराच्या पोस्ट लिहिल्या होत्या. अनेकदा तिला विरोध करणारे तिच्या थिरकण्यावर बोट ठेवणाऱ्यांनी तिला पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं.
महिलांच्या हाती सुरक्षा...
गौतमी पाटीलच्या एका कार्यक्रमात चक्क महिला लाठ्या हाती घेऊन दिसल्या. तिच्या कार्यक्रमात होणारे राडे काही नवीन नाहीत. त्यामुळे महिलांनीच सुरक्षा म्हणून काठ्या हाती घेऊन तरुणाईला आवरण्याचा प्रयत्न केला होता.