गजानन मारणे आणि त्याच्या आठ साथीदारांना कोथरुड पोलिसांकडून अटक
2014 साली पुण्यात झालेल्या दोन हत्यांच्या शिक्षा भोगत असलेल्या गजानन मारणेची सोमवारी सुटका करण्यात आली. त्यांनतर मारणेच्या शेकडो समर्थकांनी पुण्याला येताना एक्स्प्रेसवेवर हैदोस घातला.
पुणे : तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर समर्थकांसह शक्तीप्रदर्शन करणाऱ्या पुण्यातील गुंड गजानन मारणेला पोलिसांनी रात्री उशीरा अटक करण्यात आली आहे. कोरोनामुळे लागू असलेल्या साथ नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
कोरोनामुळे लागू असलेल्या साथ नियंत्रण कायद्याचे उल्लंघन करून बेकायदा गर्दी जमवणे, दहशत निर्माण करणे, सार्वजनिक शांततेचा भंग करणे अशा प्रकारचे गुन्हे मारणेवर नोंद करण्यात आलेत. एकूण दोनशे ते अडीचशे जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यापैकी 26 नावे पोलिसांना समजली आहेत. त्या 26 जणांपैकी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. गजानन मारणेवर पिंपरी चिंचवड पोलिस स्टेशनला देखील गुन्हा दाखल झाला असून त्या प्रकरणात देखील त्याला अटक होण्याची शक्यता आहे.
कोण आहे गजानन मारणे?
मागील अनेक दशकांपासून गजानन मारणे हे नाव पुण्यातील गुन्हेगारी विश्वाच्या केंद्रस्थानी आहे. हत्या, हत्येचा प्रयत्न, अपहरण, खंडणी, बेकायदा शस्त्रं बाळगणं असं अनेक गुन्हे मारणेवर नोंद आहेत. 2014 साली विरोधी टोळीतील पप्पू गावडे आणि अमोल बधे यांच्या हत्येच्या आरोपाखाली मारणेला त्याच्या साथीदारांसह अटक करण्यात आली होती. त्यातील अमोल बधेचा खून तर पुण्यातील नवी पेठेत पाठलाग करून धारदार शस्त्रांच्या साहाय्याने करण्यात आला होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या थरारक घटनेने पुण्यात खळबळ उडाली होती.
गजानन मारणेच्या स्वागतासाठी जमलेल्या त्याच्या समर्थकांमध्ये तरुणाईत नुकत्याच प्रवेश केलेल्या युवकांचं प्रमाण अधिक आहे. गुन्हेगार आणि गुन्हेगारीचं अशाप्रकारे होणारं उदात्तीकरण या तरुणांची पावलं गुन्हेगारी विश्वाकडं वळण्यास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे या उद्दात्तीकरणाला जर वेळीच आळा घातला नाही, तर त्यातून असे अनेक गजानन मारणे निर्माण होण्याची भिती आहे. आणि तसं झाल्यास त्याला जबाबदार पोलिसच असणार आहेत.
संबंधित बातम्या :