Pune Crime News: दोन दिवसात दोन मोठ्या फसवणूकीच्या घटना! बिटकॉइनमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने सुमारे 14 लाख रुपयांची फसवणूक
बिटकॉईनमध्ये गुंतवणूकीवरुन फ़सवणूक झाल्याची घटना घडली आहे. बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळेल असं भासवून ही फसवणूक केली आहे.
Pune Crime News: बिटकॉईनमध्ये (bitcoin) गुंतवणूकीवरुन फ़सवणूक झाल्याची घटना घडली आहे. बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळेल असं भासवून ही फसवणूक केली आहे. तब्बल 13 लाख 67 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. ही घटना 8 एप्रिल ते 3 मे या कालावधीत यमुनानगर निगडी येथे घडली. या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाई केली आहे. निगडी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात 38 वर्षीय राकेश ईश्वरदास लोहारयांनी दोन दिवसांपुर्वी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादीशी तीन वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क करण्यात आला. आरोपीने त्याला बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले. बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे तक्रारदाराला सांगण्यात आले. त्यानुसार तक्रार दाराने प्रक्रिया केली आणि त्याची फसवणूक झाली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
व्हॉट्सअॅपवर लिंक पाठवून केली फसवणूक
आरोपीने तक्रारदाराला व्हॉट्सअॅपवर लिंक पाठवली. या लिंकद्वारे तक्रारदाराने आपली वैयक्तिक माहिती टाकून बिटकॉईन अॅप डाउनलोड केले. तक्रारदाराने या अॅपद्वारे तब्बल 13 लाख 67 हजार रुपये भरले. मात्र त्याला कोणताही परतावा मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी निगडी पोलिसात एफआयआर दाखल केला.
फ्रॅंचाईजीच्या अमिषाने महिलेची 79 लाखांची फसवणूक
दोन दिवसांपुर्वीच अशी घटना घडली होती. प्रसिद्ध हॉटेल के एफ सी ची (KFC) फ्रॅंचाईजी काढून देतो असे सांगत चोरट्यांनी एका महिलेची तब्बल 79 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा (Pune Cyber Police station) दाखल करण्यात आला होता. गेल्या तीन महिन्यांपासून हा सगळा प्रकार सुरू होता. महिला तक्रारदार ही इस्टेट एजंट असून गेल्या काही दिवसांपासून पैशाची गुंतवणूक करण्यासाठी ती महिला कंपनी शोधत होती. गौरव निकम, राहुल शिंदे आणि राहुल मॅथ्यू असे नाव सांगून आरोपीची आणि त्या महिलेची ओळख झाली. या तिघांनी त्या महिलेला केएफसी हॉटेलची फ्रँचाईजी देतो अशी बतावणी केली होती. सायबर चोरट्यांनी त्या महिलेला चार वेगवेगळ्या बँक अकाउंटमध्ये तब्बल 79 लाख 76 हजार रुपये ऑनलाईन पाठवण्यास सांगितले होते. एखाद्या मोठ्या हॉटेलची फ्रेंचाईजी मिळते आहे असे वाटल्याने त्या महिलेने त्यांना रक्कम देखील पाठवली होती.