बारामतीत बनावट रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री करणारी टोळी गजाआड
बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन बनवून विकणाऱ्या टोळीचा बारामती पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. रेमडेसिवीरच्या रिकाम्या बाटलीत पॅरासिटेमॉलचे औषध भरून हे आरोपी रेमडेसिवीर इंजेक्शन म्हणून विक्री करत होते.
बारामती : राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा भासत आहे. चिंताग्रस्त रुग्णांचे नातेवाईक एका इंजेक्शनसाठी इथून तिथून धावपळ करत आहे. मागेल ती किंमत द्यायला रुग्णांचे नातेवाईक तयार आहेत. मात्र इंजेक्शनच शिल्लक नसल्याने मोठं संकट उभं राहिलं आहे. मात्र अशा बिकट परिस्थितीतही काहींना पैसे कमावणे महत्वाचं वाटत आहे. त्यातून बारामतीत बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन बनवणाऱ्या टोळीचा पोलिसांना पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांना चार आरोपींना अटक केली आहे.
बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन बनवून विकणाऱ्या टोळीचा बारामती पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. रेमडेसिवीरच्या रिकाम्या बाटलीत पॅरासिटेमॉलचे औषध भरून हे आरोपी रेमडेसिवीर इंजेक्शन म्हणून विक्री करत होते. त्या बनावट इंजेक्शनाची विक्री ही प्रत्येकी 35 हजार रुपयाला केली जात होती. एका रुग्णाला रेमडेसिवीर इंजेक्शनाची गरज होती. म्हणून रुग्णाच्या नातेवाईकाने पोलिसांच्या मदतीने टोळीतील एकाशी संपर्क साधला. त्याने 35 हजाराला एक अशी मिळून 70 हजाराची दोन इंजेक्शन नातेवाईकाला विकत असताना बारामती तालुका पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली.
या आरोपींकडून अधिक चौकशी केली असता आणखी दोन आरोपींचा शोध पोलिसांना लागला. त्यानंतर त्या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. एकूण चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत घरत, शंकर भिसे, दिलीप गायकवाड आणि संदीप गायकवाड अशी आरोपींची नावे आहेत.
या आरोपींसह गुन्ह्यात वापरलेली फॉर्च्युनर गाडी देखील पोलिसांनी जप्त केली आहे. संदीप गायकवाड हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय म्हणून काम करत होता. तो रेमडेसिवीरच्या रिकाम्या बाटल्यात बनावट इंजेक्शन भरून ते दिलीप गायकवाडला देत व त्याची विक्री शंकर भिसे आणि प्रशांत घरत करत असत. यातील मुख्य आरोपी दिलीप गायकवाड आहे. दिलीप गायकवाड आणि प्रशांत घरत हे या औषधाची विक्री करत होते. या आरोपीकडील 3 बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन देखील जप्त करण्यात आले आहेत. सदर गुन्ह्यात आणखी कुणाचे लागेबांधे आहेत का याचा तपास देखील पोलिस करत आहेत.