माजी खासदार आणि जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते संभाजीराव काकडे यांचं वृद्धापकाळाने निधन
संभाजीराव काकडे यांचं वृद्धापकाळाने 90 व्या वर्षी निधन झालं. संभाजीराव काकडे यांच्या निधनानंतर शरद पवार यांनी ट्वीट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
पुणे : माजी खासदार आणि जनता पक्षाचे नेते संभाजीराव काकडे यांचं वृद्धापकाळाने 90 व्या वर्षी निधन झालं आहे. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1967 साली काँग्रेस पक्षामध्ये झालेल्या फुटीनंतर ते महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष होते. गेल्या वर्षभरापासून ते आजारी होते.
संभाजीराव काकडे यांच्या निधनानंतर शरद पवार यांनी ट्वीट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. शरद पवारांनी लिहिलं की, "माजी खसदार संभाजीराव काकडे यांच्या निधनाने बारामतीतील मातब्बर राजकीय व्यक्तिमत्व हरपले. जनता दलाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी राज्याच्या राजकारणावर दीर्घकाळ प्रभाव टाकला. नव्या नेतृत्वाला दिशा देण्याचे कार्य निष्ठेने केले. शोकमग्न कुटुंबीयांप्रति सहसंवेदना. भावपूर्ण आदरांजली!.”
माजी खा. संभाजीराव काकडे यांच्या निधनाने बारामतीतील मातब्बर राजकीय व्यक्तिमत्व हरपले. जनता दलाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी राज्याच्या राजकारणावर दीर्घकाळ प्रभाव टाकला. नव्या नेतृत्वाला दिशा देण्याचे कार्य निष्ठेने केले.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 10, 2021
शोकमग्न कुटुंबीयांप्रति सहसंवेदना. भावपूर्ण आदरांजली!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
ज्येष्ठ नेते, माजी खासदार संभाजीराव काकडे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हटलं की, संभाजीराव काकडे साहेब सामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी तळमळीनं कार्य करणारे नेते होते. शेतकरी, कष्टकरी, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या उन्नतीसाठी त्यांनी जीवनभर काम केले. पुणे जिल्ह्याच्या विकासात मोलाचं योगदान दिलं. राजकारण, समाजकारण, सहकार अशा समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात कार्य करणारं ध्येयवादी, तत्वनिष्ठ नेतृत्वं म्हणून ते कायम स्मरणात राहतील. संभाजीराव काकडे साहेब सार्वजनिक जीवनात ‘लाला’ नावाने परिचित होते. त्यांचं निधन ही पुणे जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी आहे. जिल्ह्यानं ज्येष्ठ, मार्गदर्शक नेतृत्वं गमावलं आहे. मी, पवार कुटुंबिय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काकडे कुटुंबियांच्या आणि कार्यकर्त्यांच्या दु:खात सहभागी आहोत. स्वर्गीय संभाजीराव काकडे साहेबांना सद्गती लाभो, अशी प्रार्थनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात केली आहे.