Pune Ganpati Visarjan: पुण्यात पहिले पाढे पंचावन्न, चोख नियोजन करुनही विसर्जन लांबलं, 22 तास उलटूनही मिरवणुका सुरुच
Pune Ganpati Visarjan: पुण्यातील सार्वजनिक गणेश विसर्जनाला 22 तास पूर्ण झाले आहेत, पोलिसांकडून मिरवणुका लवकरात लवकर संपवण्याचे आवाहन केले जात आहे.
पुणे: पुण्यातील गणेश विसर्जनाच्या (Ganpati Visarjan) मिरवणुका आज(बुधवारी) दुसऱ्या दिवशी ही जल्लोषात सुरू आहेत. काल(मंगळवारी) संध्याकाळी पुण्यातील मानाच्या पाच गणपतीचे विसर्जन (Ganpati Visarjan) झाल्यावर श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन रात्री ९ वाजता पार पडले. रात्री उशिरा पर्यंत विसर्जन मिरवणूक सुरू होती. रात्री पारंपरिक वाद्य वाजवत काही मंडळांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला. तर काहींनी मल्लखांब करत मंडळाचं वेगळेपण दाखवून दिलं. ज्या गणेश मंडळांनी डीजे लावलेले होते ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज सकाळपासून पुन्हा एकदा विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. पोलिसांनी काल रात्री दिलेल्या माहितीनुसार ही विसर्जन (Ganpati Visarjan) मिरवणूक दुपारी १२ पर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे.
पुण्यातील सार्वजनिक गणेश विसर्जनाला 22 तास पूर्ण
पुण्याच्या मिरवणुकीला 22 तास पूर्ण आतापर्यंत अलका चौकातून 88 मंडळे पुढं गेली आहेत. अलका टॉकीज चौकातून डी जे लावलेले मंडळे आता विसर्जनासाठी अंतिम मार्गावर निघणार आहेत. भाऊ रंगारी गणपती अलका चौकात दाखल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून मिरवणूक लवकर पूर्ण होण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांना आग्रह केला जात आहे. आतापर्यंत 88 गणपती मंडळे अलका चौकातून पुढे गेली आहेत. हा आकडा लक्ष्मी, कुमठेकर आणि टिळक मार्गावरील आहे.
विसर्जन मिरवणुकीत आधी नंबर कोणाचा वरून वाद
मंडई, बाबू गेणू, भाऊसाहेब रंगारी या महत्त्वाच्या गणपती मंडळाच्या विसर्जन मिरवणूका मध्यरात्र उलटून गेल्यावर देखील अजून सुरूच झाली नाही. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे नऊच्या दरम्यान विसर्जन झाले. मात्र त्यानंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांमध्ये नंबर आधी कोणाचा यावरुन वाद झाला त्यामुळे विसर्जन मिरवणूक (Ganpati Visarjan) रेंगाळली. या मंडळांची मिरवणूक सुरू होत नसल्याने पाठीमागे असलेली मंडळेही रखडली.
मिरवणूक लवकरात लवकर संपवण्याचे आयुक्तांचे आवाहन
पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, मिरवणुकीचं योग्य नियोजन करण्यात आलं आहे. मात्र पुण्यातील मिरवणुकीत अनेक मंडळांनी लेसर लाइटचा वापर केला आणि सोबतच डीजेचा वापर केला आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस तैनात आहेत. मिरवणूक लवकरात लवकर संपवण्याचे आवाहन गणेश मंडळांना केलं जात आहेत. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे विसर्जन मिरवणुका उशिरापर्यंत चालणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मानाचा पहिला - कसबा गणपती
10:30 - मिरवणुकीची सुरुवात
11:10 - बेलबाग चौकात
3:35 - अलका चौक
4:32 - नटेश्वर घाटावर विसर्जन
मानाचा दुसरा - तांबडी जोगेश्वरी
10:40 - मिरवणुकीला सुरुवात
12:00 -बेलबाग चौक
4:12 - अलका चौक
5:10 - नटेश्वर घाटावर विसर्जन
मानाचा तिसरा - गुरुजी तालीम
11:10 - मिरवणुकीला सुरुवात
1:12 - बेलबाग चौक
5:16 - अलका चौक
6:43 - नटेश्वर घाटावर विसर्जन
मानाचा चौथा - तुळशीबाग
11:50 - मिरवणुकीला सुरुवात
2:20 - बेलबाग चौक
6:17 - अलका चौक
7:12 - पाताळेश्वर घाटावर विसर्जन
मानाचा पाचवा - केसरीवाडा
12:25 - मिरवणुकीला सुरुवात
3:23 - बेलबाग चौक
6:27 - अलका चौक
7:38 - पाताळेश्वर घाटावर विसर्जन